नगर : पुढारी वृत्तसेवा : भिंगार शहरातील विजय लॉईन चौकात जमिनीच्या वादातून दोन गटात तलवार, दगडाने तुंबळ हाणामारी झाली. त्यात दोघे जखमी झाले असून, दोन्ही गटाच्या 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली.
प्रतीक अजित लालबोंद्रे (रा. खळेवाडी, भिंगार) यांच्या फिर्यादीवरून सुनील भिंगारदिवे (रा. सैनिकनगर), विजय साळवे (रा. माधवबाग नागरदेवळे), संदेश सोनवणे, अक्षय साळवे, प्रितम हरबा, जय ओव्हळ (सर्व रा. माधवबाग, नागरदेवळे) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला.
प्रतीक लालबोंदरे याने फिर्यादीत म्हटले, लालबोंदरे व मित्र अक्षय हंपे यांनी बाराबाभळी येथील निजाम पठाण यांच्या मालकीची सात गुंठे जागा विकत घेतली होती. ती जमीन निजाम पठाण याने गोवर्धन मोरे यांना 2022 मध्ये काही अटीशर्तीवर दिली. याबाबत मोरे यांच्या घरी जाऊन ती जमीन पठाण यांच्या पत्नीच्या नावावर करून द्या. त्यामुळे ती जमीन आम्हाला घेता येईल, अशी बोलणी करून दुचाकीवरून विजय लाईन चौकात आलो असता तुम्ही गोवर्धन मोरे यांच्या घरी कशाला गेला होता, असे म्हणून वरील आरोपींनी तलवार, दगड व टणक वस्तूने मारहाण केली. त्यात प्रतीक लालबोंद्रे व अक्षय हंपे जखमी झाले.
दरम्यान, दुसर्या गटाच्या अक्षय उर्फ विजय रमेश साळवे(रा. माधवबाग, आलमगीर) याच्या फिर्यादीवरून सागर ठोंबरे (रा. माळीवाडा, नगर), अक्षय हंपे (रा. सौरभ नगर भिंगार), अभि शेलार (रा. भिंगार), प्रतीक लालबोंद्रे (रा. भिंगार), रोहित उर्फ रूपू शिस्वाल (रा. माधवबाग, भिंगार) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. अक्षय साळवे फिर्यादीत म्हटले, मित्र सनी भिंगारदिवे याच्याबरोबर दुचाकीवर स्टेट बँक चौकातून घरी जात असताना सनीला आरोपीचा फोन आला. विजय लाईन चौकात या, महत्त्वाचे बोलायचे आहे. तिथे गेलो असता तुम्ही भाई झाले का, गोवर्धन मोरे याच्या जमिनीशी तुमचा काय संबंध असे म्हणून वरील लोकांनी दगड, टणक वस्तूने जबर मारहाण केली. जखमी अक्षय साळवे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा :