नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील इमामपूर घाटातील डोंगराला लागलेल्या वणव्यात शेकडो हेक्टर वनसंपदा जळून खाक झाली. ही घटना गुरुवारी (दि.23) घडली. वणव्यात कवडा डोंगर पूर्णपणे जळून खाक झाला आहे. वन्यप्राणी सैरभैर होऊन धावत होते, तर अनेक औषधी वनस्पतींचेही मोठे नुकसान झाले आहे. वणव्यात इमामपूर, तसेच खोसपुरी हद्दीतील शेकडो हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले आहे. इमामपूर घाटात लागलेल्या वणव्याने रौद्ररूप धारण केले होते.
वाळलेले गवत व वारा, यामुळे वणव्याने मोठे क्षेत्र व्यापले. कडक उन्हामध्ये वणवा आटोक्यात आणणे वनविभागाचे अधिकारी व कर्मचार्यांसमोर मोठे आव्हान होते. इमामपूर घाटातील डोंगरात जाळाचे व धुराचे लोळचे लोळ दिसून येत होते. वणवा आटोक्यात आणण्यासाठी इमामपूर येथील स्थानिक तरूण, तसेच जेऊर येथील वनमित्र पथकातील सदस्य मायकल पाटोळे, सनी गायकवाड यांनी मदत केली. मागील आठवड्यात बहिरवाडी येथील वाकी वस्तीवर लागलेल्या वणव्यात शेकडो हेक्टर वनक्षेत्र जळालेे. इमामपूर येथील वणवा आटोक्यात आणण्यासाठी वनपाल मनेष जाधव, वनरक्षक श्रीराम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्यांनी प्रयत्न केला. त्यांना जेऊर येथील वनमित्र पथकातील सदस्यांनी मदत केली.