अहमदनगर

कर्जतला सीना धरणातून आवर्तन; लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना दिलासा

अमृता चौगुले

मिरजगाव; पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील सीना धरण लाभक्षेत्रातील मिरजगावसह अनेक गावांना शुक्रवारी (दि.3) उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना दिलासा मिळणार असून, रब्बी पिकांचा हंगाम संपत आल्याने शेतकरी खरीप हंगामाची तयारत गुंतला आहे. तसेच, उन्हाळी पिके घेण्यासाठी पाण्याची गरज भासत असल्याने सीना धरणातून आवर्तनाची मागणी शेतकर्‍यांनी प्रकल्प अधिकारी व लोकप्रतिनिधींकडे केली होती. यावेळी आमदार रोहित पवारांनी शब्द दिला होता. योग्य वेळी शेवटपर्यंत आवर्तन नियमाप्रमाणे सुटेल. त्यामुळे सीना धरणातून आवर्तन सोडण्यात आले.

यावर्षी उन्हाची तीव्रता फेब्रुवारी महिन्यात वाढल्याने पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. अनेक ठिकाणी शेतीपिकांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या परिसरातील ऊस आणि फळबागा क्षेत्र विचारात घेता पाण्याची गरज अधिक तीव्र झाली होती. परंतु, वेळेत आवर्तन सुटल्याने शेतकर्‍यांचा पाण्याचा प्रश्न आता सुटणार आहे.

यंदा सर्व आवर्तने वेळेवर आणि मुबलक प्रमाणावर सोडण्यात आल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पाण्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर करण्याचे आवाहन सीना धरणाचे उपविभागीय अभियंता संदीप शेळके यांनी केले. तसेच, शेतकर्‍यांच्या मागणीप्रमाणे पाणी सोडण्यात येण्याचे ही म्हटले आहे. तरी, लाभार्थी क्षेत्रातील शेतकर्‍यांनी पाण्यासाठी लागणार्‍या परवानगी कार्यरतून ताबडतोब घेऊन जाणे.

आकडे बोलतात
पाणी पातळी : 582.89 मीटर
एकूण साठा : 1995.60 (द.ल.घ.फू.)
उपयुक्त साठा : 1442.93 (द.ल.घ.फू.)
उजव्या कालव्यात विसर्ग : 51.61 क्युसेक
सिंचन क्षेत्र : 8445 हेक्टर
उजवा कालवा : 7672 हेक्टर
उपसा सिंचन : 1200 हेक्टर.

SCROLL FOR NEXT