नगर : वंशाचा दिवा हा म्हातारपणीच्या अंधरकारमय आयुष्यात प्रकाश देईल, या आशेने आपल्या मुलांसाठी आयुष्य वेचणार्या अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या पदरी निराशा पडताना दिसते. गत पाच वर्षांत पोटच्या मुलांनी, सुनांनी तब्बल 529 पेक्षा अधिक वयोवृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्यास असमर्थता दर्शवली आहे. यातील काही प्रकरणांत गोड बोलून ‘आहे ती मालमत्ता’ मुलांनी स्वतःच्या नावे करून घेत आई-वडिलांना अगदी घराबाहेर काढल्याच्याही तक्रारी आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकार्यांनी यातील 490 प्रकरणे निकाली काढली असून, काहींना महिन्याला 10 हजारांचा निर्वाह भत्ता (पोटगी), तर काही प्रकरणात घर, जमिनीही पुन्हा मिळवून दिल्या आहेत.
ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने अनेक कायदे केले आहेत, त्यांना संरक्षण दिले आहे. मात्र, काही कुटुंबांत मुलांचे लग्न झाल्यानंतर घरातील ज्येष्ठांंचा काहीसा छळ होताना दिसतो. जिल्ह्यातील शिर्डी, पाथर्डी, श्रीगोंदा-पारनेर, कर्जत, संगमनेर, श्रीरामपूर, नगर अशा सात प्रांताधिकारी कार्यालयांकडे अशा छळाला कंटाळून संबंधित ज्येष्ठ नागरिक तक्रारी देत असतात. त्यावर जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन निकाल देतात. जिल्ह्यातील सात प्रांत कार्यालयांकडे 2021 ते 2025 या पाच वर्षांत एकूण 529 ज्येष्ठ नागरिकांनी तक्रारी दिल्या असून, यात बहुतांश तक्रारी या आपल्या मुलांकडून, सुनांकडून, शेजारील लोकांकडून त्रास होत असल्याच्या आहेत.
काही कुटुंबांत दोन मुले वेगळी झाल्यानंतर आई-वडिलांना कोणी सांभाळायचे, यावरून कलह वाढल्याचे दिसले. दोघांनीही पूर्वीच वडिलांची मालमत्ता वाटून घेतली. काही प्रकरणांत मुलाचा मृत्यू झाला, त्या ठिकाणी सुनेने सासर्याला घराबाहेर काढले आहे. कुठे मुलगा आणि सुनांनी गोड बोलून घर नावावर करून घेतले, कुठे ‘आहे ते पैसे’ काढून घेत बँक खाते रिकामे केले आणि आता घराबाहेर काढले. आई-वडिलांचा छळ करणार्या मुलांमध्ये काही पेशाने अधिकारी, शिक्षक, एमआयडीसीत कर्मचारी आणि आता शेतकर्यांची पोरंही दिसू लागली आहेत.
सध्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. या सुनावणीमध्ये आई-वडिलांना त्रास देणार्या मुलांना प्रती महिना 10 हजार रुपये वडिलांना निर्वाहासाठी देण्याचे, तर काही प्रकरणात मुलांनी फसवून बळकावलेली मालमत्ता पुन्हा वडिलांच्या नावावर करून घेण्याचे आदेश बजावलेत. जिल्हाधिकार्यांनी 490 पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे.