अहमदनगर

श्रीगोंदा : महिलांच्या नावे बनावट अकाऊंटद्वारे चॅटिंग

अमृता चौगुले

श्रीगोंदा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर वेगवेगळ्या महिलांच्या नावाने बनावट अकाऊंट खोलून त्या अकाऊंटच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक तरुणांशी चॅटिंग करणार्‍या त्या कार्यकर्त्याची रविवारी शहरातील शनिचौक परिसरात बेदम धुलाई करण्यात आली. मात्र, याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात कुठल्याच गुन्ह्याची नोंद नव्हती.

सोशल मीडियामुळे जग जवळ आले, असे म्हटले जाते. हजारो किलोमीटर दूर असणार्‍या व्यक्तीशी मिनिटामिनिटाला संवाद साधता येऊ लागला. मात्र, दुसरीकडे या सोशल मीडियाचा गैरवापर करणार्‍या मंडळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप यापेक्षा इन्स्टाग्राम या अ‍ॅप्लिकेशनचा सगळ्यात जास्त वापर होताना दिसतो.

तालुक्यातील एका नेत्याच्या कार्यकर्त्याने इन्स्टाग्रामवर अनेक महिलांच्या नावे बनावट खाते खोलून तो तालुक्यातील अनेक तरुणांशी संपर्क साधून मैत्री करायचा. त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून त्याने अनेकांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. मात्र, भीतीपोटी याबाबत कुणी बाहेर वाच्यता करत नव्हते.

दोन दिवसांपूर्वी या कार्यकर्त्याने शहरातील एका तरुणांशी संवाद साधला. त्याच दरम्यान त्या कार्यकर्त्याने वेगळीच मागणी केल्याने त्या तरुणाला संशय आला. त्या तरुणाने त्या अकाऊंटबाबतची सर्व खातरजमा केल्यानंतर ते अकाऊंट बनावट असून, हा कार्यकर्ताच हे बनावट अकाऊंट चालवत असल्याचे समोर आले.

त्या कार्यकर्त्यास रविवारी (दि.21) सकाळी या बनावट अकाऊंटबाबत विचारणा केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तरुण व त्याच्या सहकार्‍यांनी त्या कार्यकर्त्याची चौकातच यथेच्छ धुलाई केली. काही नेत्यांनी यामध्ये मध्यस्थी केल्यानंतर वादावर तात्पुरता पडदा पडला. त्या कार्यकर्त्याचे एवढे कारनामे असताना, नेतेमंडळी त्याला पाठीशी का घालत आहेत, याचाही आता शोध घ्यावा लागणार आहे.

'त्या' कार्यकर्त्याचे अनेक कारनामे उघड

या कार्यकर्त्याचे नवनवीन कारनामे उघडकीस येत असून, त्याने दोन वर्षांपूर्वी एका महिलेची छेड काढली होती. ती महिला व तिच्या महिला नातेवाईकांनी त्याला चप्पलने मारहाण केली होती. त्यानंतर त्याने एक दोन ठिकाणी अशाच कारणातून मार खाल्ल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT