श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर परिवहन विभाग कार्यालयातील भोंगळ व अनागोंदी कारभाराचे दररोज नवनवीन किस्से उघड होत आहेत. व्यवसाय कर भरल्याची विना नंबरची बोगस पावती दिली जात असल्याची तक्रार ताजी असताना आता कागदपत्रात छेडछाड करून गाड्या पासिंग करून घेण्याचा आश्चर्यकारक नवा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, याप्रकरणी पाच वाहन मालकांसह मदत करणार्या एजंटविरुद्ध मोटारवाहन निरीक्षक विनोद घनवट यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. वाहन परवाना असणार्या गाड्या दरवर्षी पासिंग कराव्या लागतात.
बाहेरील परिवहन कार्यालयात नोंदणी केलेली गाडी पासिंग करताना संबंधित कार्यालयाच्या एनओसीची आवश्यकता असते. एम एच 35 पी 44646, एम एच 12 के पी 7130, एम एच 45 टी 1637, एम एच 12 बी एल 0121 ही वाहने पासिंगसाठी श्रीरामपूर परिवहन कार्यालयात आली होती. त्यांची तपासणी करून पासिंग करताना मोटार वाहन निरीक्षक घनवट यांना शंका आली. या वाहनांची एनओसी जोडली आहे का, याची खातरजमा केली असता एनओसी जोडलेली दिसली नाही. दरम्यान, अधिक खोलात जाऊन कागदपत्रांची पडताळणी केली असता कागदपत्रात छेडछाड केल्याचे व त्यांचे फिटनेस प्रमाणपत्र तयार करून ती श्रीरामपूर परिवहन कार्यालयात नोंदणी केल्याचे भासविल्याचे लक्षात आले.
यावरून वाहन मालकांसह त्यांना मदत करणार्या एजंटांविरुद्ध गुन्हा र. नं. 1116/2022 नुसार भादंवि कलम 420, 465, 467, 468, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागदपत्रात छेडछाड केलेली वाहने कुठली आहेत, कोणत्या परिवहन कार्यालयात त्यांची नोंदणी आहे, मालक कोण, त्यांना मदत करणारे एजंट कोण, या सर्वप्रश्नांची उकल आता पोलिस करीत आहेत.
मुथा यांनी केलेल्या आरोपांना मिळाला दुजोरा
व्यवसाय कराच्या नावाखाली बोगस पावत्या देऊन परिवहन अधिकारी व एजंट यांनी संगनमताने सरकारसह जनतेची लूट चालवविल्याचा आरोप जिल्हा टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मुथा यांनी पुराव्यानिशी केला होता. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने मुथा यांच्या आरोपांना परिवहन कार्यालयाकडून एक प्रकारे दुजोराच मिळाला आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी चोरीच्या चेसीस श्रीरामपूर परिवहन कार्यालयात पासिंगसाठी आणल्या होत्या, परंतु हा प्रकार उघडकीस आल्याने गाड्यीा पोलिस स्टेशनला लावल्या होत्या. कालांतराने या चेसीस मोठी रक्कम घेऊन पासिंग केल्याची माहिती मिळत आहे. सदर प्रकरणाचाही या निमित्ताने तपास व्हावा, अशी मागणी मुथा यांनी केली आहे.