अहमदनगर

अकोले : नव्या पोलिस निरीक्षकांना आव्हान

अमृता चौगुले

अकोले; पुढारी वृत्तसेवा : केवळ कारवाईचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी शहरासह तालुक्यात किरकोळ धाडी टाकण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. गुटखा, मटका, अवैध दारुवाल्यांची पाठराखण केली जात असल्याचे दिसत आहे. या अवैध धंद्यांना ब्रेक लावत माफियांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान नुतन पोलिस निरीक्षकांपुढे आहे. ते कोणती मोहिम हाती घेतात, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. अकोले तालुका पोलिस स्टेशनला तब्बल दीड वर्षाने पोलिस निरीक्षक पद मिळाले.

नवे पोलिस निरीक्षक सुभाष भोये यांची नियुक्ती करण्यात आली. तत्कालीन पोलिस निरीक्षक एम. बी. पाटील, पो. नि. अभय परमार या वरिष्ठ अधिकार्‍यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिमोड करून आव्हानात्मक परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. गुन्हेगारी मुक्तीचा हा पॅटर्न इतर पोलिस ठाण्यात राबवला गेला. अकोल्यात केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिमोड करून न थांबता गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याच्यादृष्टीने कोतुळ, समशेरपूर, ब्राह्मणवाडा येथे पोलिस चौकी उभारण्याची गरज आहे.

नव्याने रुजू झालेले पो. नि. भोयेंकडून अवैध धंद्यांविरुद्ध धडक कार्यवाही होत नसल्याचे दिसत आहे. शहरात वाहतुकीची समस्या वाढत आहे. बेशिस्त वाहन चालक कुठेही गाडी पार्किंग करीत असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचा थेट फटका नागरिकांना बसत आहे, पण नियमांचे उल्लंघन करणारांवर कठोर कारवाई होताना दिसत नाही. परिणामी असे लोक सोकावल्याचे दिसत आहे.

तालुक्यात अवैध धंदे चालकांनी डोके वर काढले आहे. असे व्यवसाय चालविणार्‍यांवर पो. नि. भोये कधी जरब बसविणार, असा प्रश्न जनसामान्यांतुन उपस्थित केला जात आहे. अकोले पोलिस स्टेशनहद्दीतुन बेपत्ता बहुतांश तरुणींचा अद्यापि शोध लागला नाही. वाहने, सोने चोरणार्‍यांना गजाआड केले नसल्याने सोने आणि वाहने चोरीस गेलेले तक्रारदार अकोले पोलिस स्टेशनचे उबंरठे झिजविताना दिसतात. यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत गुन्हेगारी मुक्तीच्या यापुर्वीच्या पॅटर्नला तूर्त तरी ब्रेक लागला आहे. अवैध धंदे चालविणारे व्हाईट कॉलर बडे व्यावसायिक पुन्हा मोकाट झाल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

अकोलेमध्ये 'वेलकम टू पोलिस ठाणे'ची गरज!
सर्वसामान्य लोकांशी सलोख्याचे संबंध निर्माण करून पुर्वीचे पोलिस अधिकारी व पोलिसांनी जनता यांच्यात समन्वय ठेवत गुन्हेगारीची संख्या घटविली होती. आलेल्या तक्रारदारांना न्याय मिळावा, याकरिता 'वेलकम टू पोलिस ठाणे' हा विशेष प्रयोग राबविला होता. असाच सक्षम प्रयोग नुतन पोलिस अधिकारी सुभाष भोये यांनी राबविल्यास येथील जनतेला खर्‍या अर्थाने न्याय मिळेल, अशी अपेक्षा नुतन पो. नि. भोये यांच्याकडुन अकोलेकर करीत असल्याचे चित्र दिसत आहे.

SCROLL FOR NEXT