नगर; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे. यामध्ये जिल्ह्यातील 11 लाख नागरिक पात्र आहेत. मात्र, चार वर्षे उलटली तरीही आतापर्यंत केवळ 28 टक्केच नागरिकांनी आरोग्य गोल्डन कार्ड घेतलेले असल्याने ही योजना कागदावर रेंगाळल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, योजनेच्या प्रचार व प्रसारात कमी पडलेले प्रशासन आणि त्यामुळे नागरिकांचाही मिळणारा अत्यल्प प्रतिसाद, यामुळेच या योजनेला अपेक्षित गती नसल्याची चर्चा आहे.
सन 2018 मध्ये आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाकडून आयुष्यमान भारतमधून प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरू करण्यात आली. यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लहान मुले, महिला, पाच लाखांपर्यंत विमा कवच दिला जातो. त्यासाठी पात्र नागरिकांची यादी तयार करून त्यांना आयुष्यमान भारतचे गोल्डन कार्ड दिले जाते.
जिल्ह्यात 11 लाख नागरिकांना विमाकवच!
नगर जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेसाठी 11 लाख 955 नागरिक पात्र ठरलेले आहेत. या नागरिकांनी आधारकार्ड व रेशनकार्ड सोबत घेवून ग्रामपंचायतींच्या संग्राम सेवा केंद्र किंवा सेतूमध्ये जाऊन नोंदणी करायची आहे. त्यानंतर संबंधितांना आयुष्यमान भारतचे आरोग्य विमा कार्ड दिले जाते.
साडेतीन लाख लाभार्थ्यांकडेच कार्ड!
सध्या 11 लाख पात्र लाभार्थ्यांपैकी 3 लाख 44 हजार 523 नागरिकांची नोंदणी पूर्ण झाली असून, त्यांना 'आयुष्यमान भारत'चे कार्डही मिळाले आहे. ज्यांच्याकडे कार्ड आहेत, त्यांना शासनाने निवडलेल्या रुग्णालयांमध्ये गंभीर आजारावर पाच लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जात आहेत.
असे मिळणार मोफत उपचार
पात्र नागरिकांनी आरोग्य गोल्डन कार्ड काढणे गरजचे आहे. शासनाने निवडलेल्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी गेल्यावर त्या ठिकाणी असलेल्या आरोग्यमित्राकडे आपले गोल्डन कार्ड जमा करायचे. त्यानंतर संबंधित प्रशासन आवश्यक ती नोंदणी प्रक्रिया पूर्ण करताच आपल्या मोफत उपचाराचा मार्ग मोकळा होतो.
या आजारांवर मोफत उपचार
केंद्राच्या विमा कवचात पात्र नागरिकांना हदयाची शस्त्रक्रिया, किडणीचे आजार, अपघात उपचार, मेंदुचे आजार, कॅन्सर इत्यादी गंभीर आजारावरील शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. मात्र, थंडी, ताप इत्यादी आजारांवर हा लाभ मिळणार नाही.
कार्डसाठी यांच्याकडे करा संपर्क!
योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायतींनी फलकावर डकविलेली आहे. योजनेचे कार्ड काढण्यासाठी यादीतील नागरिकांना समस्या निर्माण झाल्यास गावातील आशा सेविका, आरोग्य मित्र तसेच ग्रामपंचायत कर्मचार्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.
शिबिरांद्वारे जनजागृती कार्यक्रम
आयुष्यमान भारतचे कार्ड काढण्यासाठी नागरिकांचा अजूनही अपेक्षित प्रतिसाद नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात ठिकठिकाणी शिबिरे घेऊन त्यातून जनजागृती तसेच कार्ड वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. पात्र नागरिकांनीही आरोग्य मित्र,आपले सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायतीमधील सेवा केंद्रातून आपले कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा समन्वयक डॉ. मयूर मुथा यांनी केले आहे.
'महात्मा फुले'मुळे 'आयुष्यमान'कडे पाठ!
केंद्राच्या आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाखांचे विमा कवच असले, तरीही त्यासाठी आवश्यक कार्डची गरज भासते. याउलट राज्य शासनाची महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतून दीड लाखाचे कवच आहे. या लाभासाठी केवळ रेशनकार्ड दाखविले, तरीही लाभ दिला जातो.
रुग्णालयात मोफत उपचार
एकूण रुग्णालये ः 43
शासकीय रुग्णालये ः 3
मेडिकल कॉलेज ः 2
खासगी रुग्णालये ः 38