अहमदनगर

नगर : कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘दक्षता’!

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात दक्षता समितीच्या बैठकीत कॉपीमुक्त परीक्षेसाठी लक्ष केंद्रीत करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केल्या. दरम्यान, संवेदनशील केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी काही केंद्रांवर जमावबंदीचे आदेशही लागू करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी परीक्षेसंदर्भात दक्षता समितीची बैठक झाली. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी परीक्षेचा कालावधी, परीक्षेचे केंद्र, विद्यार्थी संख्या, परिरक्षक इत्यादी नियोजनाबाबत माहिती दिली. परीक्षा केंद्र संचालकांची बैठक घेवून केंद्र स्तरावर दक्षता पथकाची स्थापना केली जाणार आहे.  परीक्षा केंद्र परिसरात गर्दी कमी होत नसेल, तर प्रसंगी जमावबंदीचे कलम 144 हे लागू करण्यासंदर्भातही समितीमधील सदस्यांनी चर्चा केली.

अशी आहे दक्षता समिती
जिल्हाधिकारी डॉ. भोसले समितीचे अध्यक्ष तर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलिस अधिक्षक राकेश ओला, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील हे सदस्य आणि सदस्य सचिव म्हणून माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांचा समावेश आहे.

झेरॉक्स दुकाने बंद
परीक्षा कालावधीत जास्तीत जास्त परीक्षा केंद्रांना भेटी द्या, प्रत्येक परीक्षा केंद्रावर गटविकास अधिकारी भेटी देतील, परीक्षार्थींना कोणताही विनाकारण त्रास होणार नाही, याची दक्षता समिती काळजी घेईल, सर्व परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलिस बंदोबस्त द्यावा, परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स दुकाने परीक्षा कालावधीत बंद ठेवावीत, तसेच दरवर्षी 10 मिनीटे अगोदर प्रश्नपत्रिका मिळत होती, मात्र यावर्षी ती दिली जाणार नाही.

जिल्हाधिकारी यांनी दक्षता समितीची बैठक घेतली. बारावी आणि दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात, तसेच विद्यार्थ्यांनीही तणावमुक्त परीक्षा द्यावी, यावर मार्गदर्शन केले.
                                               – अशोक कडूस, शिक्षणाधिकारी माध्यमिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT