अहमदनगर

नगर : कोळगावच्या ध्वजाला शिखर शिंगणापूरमध्ये मान

अमृता चौगुले

कोळगाव : पुढारी वृत्तसेवा : गुढीपाडव्याच्या दुसर्‍या दिवशी कोळगाव येथील महादेव मंदिरातील श्री महादेवाचा पोशाख, म्हणजेच ध्वज काढून, तो 140 किलोमीटरवरील शिखर शिंगणापूर (ता. माण, जि. सातारा) येथे अष्टमीला श्री शंकर व बळी मंदिराच्या कळसाला लावला जातो. त्यानंतरच तेथील शंकर व पार्वतीचे लग्न लावले जाते. त्यासाठी कोळगाव येथून मोठ्या संख्येने भाविक उत्साहाने रवाना झाले आहेत.
या परंपरेला अनेक वर्षांचा इतिहास आहे. कोळगाव येथील महादेव मंदिर छत्रपती शिवरायांच्या काळातील असावे आणि परिसरातील आखीव-रेखीव बारव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधली असावी, असे मानले जाते.

महादेव देवस्थानाची मालकी व मंदिर देवस्थानला असलेली 250 एकर जमीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या मालकीची आहे. त्या काळी ही जमीन साळी समाजाच्या व्यक्तींना सेवेकरी म्हणून इनाम देण्यात आली होती. या देवस्थानचा मानाचा ध्वज म्हणजेच पोशाख पाडव्याच्या दुसर्‍या दिवशी शिखर-शिंगणापूर येथे सेवेकरी साळी महाराज व ग्रामस्थ पायी घेऊन जातात. तेथे अष्टमीला हा ध्वज शिखर शिंगणापूरच्या बळी व महादेव मंदिराला लावला जातो.

कोळगावच्या ध्वजाचा मान घेतल्यानंतरच शिंगणापूर येथील महादेव-पार्वतीचे लग्न दुपारी बारा वाजता लागते. तेथून ग्रामस्थ नवमीला माघारी कोळगावला येतात व हनुमान जयंतीला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कोळगावचे कुलदैवत श्री कोळाईदेवीची यात्रा भरते. त्यामुळे छत्रपतींचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूरला कोळगावच्या ध्वजाचा विशेष मान असतो. हा ध्वज येथील मंदिरांना लावल्यानंतर इतर मानाचे हजारो ध्वज लावले जातात. दर वर्षी हजारो भाविक हा ध्वज लावण्यासाठी 140 किलोमीटर अंतर चालत शिखर शिंगणापूरला जातात. सदर ध्वज व कावडीची मिरवणूक गावातून काढली जाते व दुसर्‍या दिवशी गैबीनाथ मंदिरासमोरील माळावर हजारोंच्या संख्येने भाविकांच्या उपस्थितीत या ध्वजाचे प्रस्थान शिखर शिंगणापूरला केले जाते.

चक्रवर्ती सिंधणदेवांनी वसवले गाव
शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोन्ही यादव कुळातील चक्रवर्ती सिंधणदेव महाराजांनी वसवली आहे, असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठे नंदी आहेत. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंधण राजा येथे येऊन राहिला होता, असे सांगितले जाते.

SCROLL FOR NEXT