अहमदनगर

पारनेर तालुक्यातील मळगंगा ट्रस्टचे विश्वस्त मंडळ बरखास्त; ‘धर्मादाय’चा निर्णय

अमृता चौगुले

जवळा/निघोज; पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे नवनिर्वाचित विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. अहमदनगर येथील धर्मादाय उपायुक्त यांच्या न्यायालयाने नुकताच हा निकाल दिला आहे. या देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची मुदत 2022 मध्ये संपली होती. पुढील व्यवस्थापन मंडळ निवडी वेळी सभासदांना विश्वासात न घेता, गावातील पाच नागरिकांची पंच समिती नेमून त्यांनी सुचविलेल्या नावांची विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली होती.

परंतु, विश्वस्त निवडीच्या या बेकायदेशीर पद्धतीवर निघोज येथील मंगेश वराळ, दत्तात्रय भुकन व बबन कवाद यांनी आक्षेप घेत धर्मादाय उपायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीत विश्वस्त निवडीत पंच कमिटीने घराणेशाही, एकाधिकारशाहीचा वापर करत मनमानी केल्याचा आरोप केला होता. तसेच, ट्रस्टच्या घटनेत विश्वस्त निवडीविषयी अशी तरतूद नसल्याने, असे घटनाबाह्य निवडलेले विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली होती.

यावर धर्मादाय न्यायालयाने नवनिर्वाचित विश्वस्त व पंच कमिटीला आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्यांना अनेक वेळा संधी देऊनही काहीच म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे धर्मादाय उपायुक्त न्यायालयाचे पीठासन अधिकारी श्रीमती यू. एस. पाटील यांनी नवनिर्वाचित विश्वस्त मंडळ बेकायदेशीर असल्याचे घोषित केले.

या निर्णयामुळे मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या नवनिर्वाचित प्रभाकर कवाद, शांताराम लंके, ज्ञानदेव लंके, शांताराम कळसकर, शिवाजी वराळ, बाळासाहेब लामखडे, रामदास वरखडे, वसंत कवाद, अमृता रसाळ, शंकर लामखडे, लक्ष्मण ढवळे, रामदास ससाणे, मंगेश लंके, ज्ञानेश्वर वरखडे, बजरंग वराळ, संतोष रसाळ, दिलीप लाळगे, गौतम तनपुरे, भास्कर वराळ, दिलीप ढवण, मनोहर राऊत यांचे विश्वस्त मंडळ बरखास्त झाले.

निकालावर समाधानी
ट्रस्टमध्ये चाळीस वर्षांपासून घराणेशाही व एकाधिकारशाहीतून मनमानी कारभार सुरू होता. वर्षानुवर्षे तेच पदाधिकारी पदांना चिटकून होते. सामान्य नागरिक, महिला व युवकांना ट्रस्टमध्ये काम करण्याची संधी दिली जात नव्हती. या निकालाने त्यांच्या मनमानी कारभाराला चपराक बसली आहे. या निकालावर आम्ही समाधानी आहोत. पुढील ट्रस्ट निवडीत महिला, युवक व नवीन चेहर्‍यांना संधी देण्याची आमची मागणी कायम आहे, असे मंगेश वराळ, दत्तात्रय भुकन यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT