अहमदनगर

शेतकर्‍यांचा अमरापूरमध्ये रास्ता रोको; अतिवृष्टीच्या अनुदानासह विविध मागण्या

अमृता चौगुले

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीच्या अनुदानासह विविध मागण्यांंसाठी अमरापूर येथे शेतकर्‍यांनी रास्तारोको आंदोलन केले. पंधरा दिवसांत याची अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. गतवर्षी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त पिकांसाठी शासनाने अनुदान मंजूर करूनही अद्यापि ते शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले नाही. तसेच यंदाही हवामानाच्या बदलाने खरीप व रब्बी पिकांना धोका झाला. त्यामुळे खरिपाची अंतिम आणेवारी पन्नास पैशाच्या आत लावण्यात आली .मात्र, रब्बीची नजर आणेवारी सुधारीत 75 पैसे जाहीर करून प्रशासनाने शेतकर्‍यांवर अन्याय केला आहे. आता अंतिम आणेवारी पन्नास पैशाच्या आत लावण्याची मागणी होत आहे.

शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांसह शेतकर्‍यांनी, कपाशीला 11 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा, अतिवृष्टीचे अनुदान त्वरित शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, रब्बीची अंतिम आणेवारी पन्नास पैशाच्या आत जाहीर करावी, सन 2022 -23 मधील खरीप पीक विमा मिळावा, नियमीत कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांचे 50 हजार रुपये अनुदान मिळावे, शेतकर्‍यांसाठी असलेली सौरपंप योजना कृषी खात्यामार्फत ऑफलाईन करावी, अशा मागण्यांसाठी काल सकाळी अमरापूर येथे रास्ता रोको आंदोलन केले.

सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनात परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. शेतकरी मंडळाचे शिवराज कापरे, मळेगावचे माजी सरपंच चंद्रकांत निकम, अमरापूरचे माजी सरपंच विजय पोटफोडे, चेअरमन बाळासाहेब पोटफोडे, सचिन खैरे, सुभाष अडसरे, सुधाकर पोटफोडे, दिलीप पोटफोडे आदीसह शेतकरी सहभागी झाले होते.

SCROLL FOR NEXT