अहमदनगर

कामाला सुरूवात झालेली असताना प्रशिक्षण केंद्र हलविण्याचा पुन्हा भाजपचा अट्टहास : आमदार रोहित पवार

अमृता चौगुले

जामखेड : पुढारी वृत्तसेवा :  कर्जत-जामखेड मतदारसंघात मंजूर झालेले राज्य राखीव पोलिस बल गट (एसआरपीएफ) प्रशिक्षण केंद्र जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे हलविण्यात आले होते. रोहित पवार आमदार होताच त्यांनी पाठपुरावा करून महाविकास आघाडी सरकारच्या काळात केंद्र पुन्हा मतदारसंघात खेचून आणले. केंद्राचे काम प्रगतिपथावर असताना आता भाजपकडून पुन्हा हे प्रशिक्षण केंद्र हलविण्याचा घाट घातला जात आहे. मात्र, राजकीय दबावाने हे केंद्र हलविण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे मंजूर झालेले हे प्रशिक्षण केंद्र युती सरकारच्या व त्यावेळचे आमदार आणि मंत्री राहिलेले राम शिंदे यांच्या कार्यकाळात जळगाव जिल्ह्यात हलविण्यात आले होते.

मतदारसंघात मंजूर झालेले असूनही जळगावला जाऊनही तत्कालीन मंत्री शिंदे यांना ते थांबविता आले नव्हते. शिवाय त्यांनी ना हे केंद्र मंजूर होण्यासाठी पत्रव्यवहार केला, ना ते केंद्र परत आणण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, आमदार रोहित पवार यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला. त्यानुसार योग्य ती कार्यवाही होऊन 26 जून 2020 रोजी हे केंद्र कुसडगाव (ता. जामखेड) येथे आणण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आणि 34 कोटी 37 लाख रूपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन 22 जून 2022 रोजी कार्यारंभ आदेश देऊन कामाला सुरुवातही झालेली आहे.

काम प्रगतिपथावर असताना आता भाजप सत्तेत आल्यानंतर भुसावळच्या भाजपच्या एका आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वरणगाव येथे प्रशिक्षण केंद्र होण्याबाबत पत्राद्वारे विनंती केली आणि फडणवीसांनीही पुन्हा ते प्रशिक्षण केंद्र वरणगाव येथे करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार गृह विभागाच्या पत्रव्यवहारातून कुसडगाव येथे सुरू असलेल्या कामाच्या स्थितीची, निधी वितरणाची व इतर माहिती मागविण्यात आली आहे. मात्र, तसा निर्णय घेतल्यास तो कर्जत-जामखेडच नव्हे तर नगर जिल्ह्यातील जनतेवर अन्याय करणारा ठरणार आहे.

राम शिंदे विधानपरिषदेचे आमदार झाल्यानंतर आणि भाजप सत्तेत आल्यानंतरच त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील कामे रोखून धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. फक्त राजकीय स्वार्थापोटी राज्यातील विविध कामांना स्थगिती देण्याचे प्रकरण ताजे असतानाच आता 70 टक्के काम पूर्ण झालेल्या व कोट्यवधींचा शासकीय निधी खर्च झालेल्या कुसडगाव येथील प्रशिक्षण केंद्राला हलविण्याचा तांत्रिकदृष्ट्या योग्य नसलेला घाट भाजपकडून घातला जात आहे. परंत,ु आता हे काम पूर्णत्वास आलेले केंद्र दुसरीकडे नेण्यापेक्षा केंद्रीय सुरक्षा बल, भारतीय सुरक्षा बल असे प्रशिक्षण केंद्र देखील राज्यात मंजूर आहेत. म्हणून हा पर्याय देखील राज्यासमोर उपलब्ध होता. परंतु फक्त द्वेषाचे, सुडाचे राजकारण करायचे म्हणून असा प्रयत्न केला जातोय, हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

भाजप विकासाच्या विरोधात : आमदार पवार
तांत्रिकदृष्ट्या हे पोलिस प्रशिक्षण केंद्र दुसरीकडे जाणे शक्य नाही आणि दबाव आणून जर कोणी नेण्याचा प्रयत्न केला, तर ते देखील आम्ही होऊ देणार नाही. पण, अशा पद्धतीने एखादी गोष्ट मतदारसंघात आली असेल आणि विरोधी आमदाराला त्याचे श्रेय जाऊ नये म्हणून भाजपचे लोक अशा प्रकारचे काम रद्द करणार असतील, तर हे विकासाच्या विरोधात आहे, असे आ.पवार यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT