अहमदनगर

2024 मध्ये भाजपच बहुमतात येणार : ना. विखे

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भ्रष्ट ठरलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी समझोता करून, सत्ता उपभोगत मोठी राजकीय चुक केली. भ्रष्टाचार, माफियागिरी करीत मागिल महाविकास आघाडी शासनाने राज्याचा विकासाचा आलेख खाली आणला, असे टीकास्त्र सोडून भाजप सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकहाती वरचष्मा राखणार असल्याचे प्रतिपादन महसूल, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी केले. राहुरी येथील भाजपच्या पदाधिकार्‍यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ना. विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. शिवाजीराव कर्डिले होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील, माजी आ. चंद्रशेखर कदम, तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, भाजप जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, उदयसिंह पाटील, श्यामराव निमसे, तान्हाजी धसाळ, भैयासाहेब शेळके, भाजप युवा तालुकाध्यक्ष गणेश खैरे, भाजप ओबीसी संघटनेचे नारायण धोंगडेंसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ना. विखे यांनी महाविकास आघाडी शासनाच्या ध्येय, धोरणांवर चौफेर टीका केली. देशातील इतर राज्यात लम्पीने थैमान घातले असताना महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात आहे. लसीकरणाने आजारावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत, निळवंडे कालव्याचे पाणी 2023 पर्यंत लाभार्थ्यांना मिळणार आहे. राहुरीत अद्यावत ग्रामीण रुग्णालय उभारू. विद्यापीठ प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवू, सूरत-हैदराबाद महामार्ग अधिग्रहीत जमिनींबाबत योग्य निर्णय घेऊ, अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी पंचनामे सुरू झाले आहेत, असे ना. विखे पा. म्हणाले.

राज्यातील समस्या सोडविण्यासाठी शिंदे-फडणवीस सक्षम आहे. केंद्राने कोरोना काळात मोफत लसीकरणाच्या माध्यमातून जनसामन्यांना आधार दिला. त्यातुलनेत महाविकास आघाडी शासनातील मंत्री घरात बसून होते, याकडे लक्ष वेधत ते म्हणाले, नियमित कर्ज फेडणार्‍या शेकर्‍यांना 50 हजार अनुदान दिले जाणार आहे.सन 2024 हे भाजपचे वर्ष ठरणार आहे. केंद्राप्रमाणेच राज्यात भाजपच पूर्ण बहुमताने सत्ता स्थापण करणार असल्याचा ठाम विश्वास ना. विखे यांनी व्यक्त केला. यावेळी खा. डॉ. सुजय विखे यांनी माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांच्यावर टिका केली. तहसीलदार, पोलिस निरीक्षक व पालिका मुख्याधिकार्‍यांनी जनसामन्यांची चाकरी करावी, असे सांगत 'वाड्या'ची चाकरी केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सूचक ईशारा त्यांनी दिला.

दरम्यान, भाजप चिन्हावरच सर्व निवडणुका लढविल्या जाणार आहेत. कार्यकर्त्यांनी भाजपशी एकनिष्ठ रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
आ. कर्डिले म्हणाले, आ. तनपुरे यांनी सत्ताकाळात काय दिवे लावले, हे जनसामन्यांना कळाले. राहुरी नगरपरिषद असताना शहराचा बट्याबोळ केला. नागरदेवळा नगरपरिषद करून काय साध्य होणार होते. राहुरी शहरासह संपूर्ण मतदार संघाची वाताहात झाली. मंत्री पद असतानाही विकास कामे करता आली नसल्याची टीका करीत, भाजपशी एकनिष्ठ राहून सर्व निवडणुकांमध्ये यश संपादित करण्याचे आवाहन कर्डिले यांनी केले. ज्येष्ठ नेते अ‍ॅड. पाटील, माजी आ. चंद्रशेखर कदम यांनी भाषण केले. यावेळी प्रकाश पारख, राजेंद्र उंडे, दादा पा. सोनवणे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार फसियोद्दीन शेख उपस्थित होते. प्रास्तविक रावसाहेब चाचा तनपुरे यांनी केले तर आभार रविंद्र म्हसे यांनी मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT