श्रीगोंदा : भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी श्रीगोंदा तालुक्यातील राजकारणावर भाष्य करताना सर्वपक्षीय नेत्यांना थेट आणि महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे. 'गाडी कुणाच्या मालकीची' आहे, याकडे लक्ष देण्याची गरज असून, मालक कुणालाही कधीही गाडीतून खाली उतरवू शकतो, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे श्रीगोंद्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आमदार पाचपुते यांनी आपल्या विरोधकांवर आणि अन्य पक्षांतील नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधताना म्हटले की, ‘गाडीचे स्टेअरिंग किंवा चावी कुणाकडे आहे, या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. खरे तर, गाडी कुणाच्या मालकीची आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे.’
‘मालक कधीही गाडीतून खाली उतरवू शकतो, याचे भान सर्वपक्षीयांनी ठेवले पाहिजे,’ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
याचबरोबर, आमदार पाचपुते यांनी श्रीगोंदा तालुक्यासाठी मोठ्या निधीच्या घोषणेकडे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, ‘गाडीच्या मालकाने’ श्रीगोंदा तालुक्याला विकासासाठी निधी देण्याचा शब्द दिला आहे. एका महिन्यात श्रीगोंद्याला निधी देण्याचा गाडी मालकाचा शब्द आहे, असे सांगत पाचपुते यांनी श्रीगोंदा तालुक्यातील विकासाच्या दृष्टीने मोठी आर्थिक मदत लवकरच मिळणार असल्याचे संकेत दिल्याची चर्चा रंगली आहे.