नगर तालुक्यातील 27 पैकी पिंपळगाव लांडगा ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने 26 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. या ग्रामपंचायतींच्या निकालात आठ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले असून, 19 गावांमध्ये सत्ताधारी गटाने पुन्हा सत्ता राखली आहे. तालुक्यातील 27 पैकी भाजपाने 18 ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व राखले. तर काँग्रेस 1, राष्ट्रवादी 6, शिवसेना 2 अशा प्रकारे महाविकास आघाडीने 9 ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. दहिगावात कर्डिले गटाचा पराभव झाला असून, येथे महाविकास आघाडीचे मधुकर म्हस्के यांनी आपली सत्ता राखली. सरपंच पदी त्यांची पत्नी सुरेखा मधुकर म्हस्के निवडून आल्या. त्यांच्या विरोधात स्थानिक विरोधक एकत्र येऊनही मधुकर म्हस्के यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत सत्ता राखली आहे .
वडगाव तांदळीमध्ये पुन्हा कर्डिले गटाने वर्चस्व राखले. अनिल ठोंबरे व रावसाहेब रणसिंग यांनी एकत्रित निवडणूक लढविली. ठोंबरे, रणसिंग यांच्या विरोधात गहिनीनाथ पिंपळे यांनी चांगली लढत दिली. सरपंचपदी इंदूबाई रावसाहेब रणसिंग निवडून आल्या, तर पिंपळे यांना पराभवास सामोरे जावे लागले. सोनेवाडी (पिंपळगाव लांडगा) येथे महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. येथे सरपंच पदी बाबासाहेब एकनाथ बेरड विजयी झाले. आगडगाव मध्ये भाजपाच्या कर्डिले गटाने विजय मिळविला. येथे मच्छिंद्र कराळेंचा गट पराभूत झाला आहे. सरपंच पदी आशाबाई परमेश्वर पालवे विजयी झाल्या. सारोळा बद्धीमध्ये कर्डिले गटाचे सचिन लांडगे यांनी सत्ता राखली असून, सरपंच पदी गयाबाई शंकर डहाणे विजयी झाल्या. नारायणडोहमध्ये सत्तांतर झाले असून, शंकर साठे गटाने बाजी मारली आहे. श्रद्धा बाळासाहेब गुंड सरपंचपदी विजयी झाल्या. टाकळी खातगाव मध्ये आ. लंके गटाच्या सुनिता राजू नरवडे विजयी झाल्या. सारोळा कासारमध्ये भाजपाचे रवींद्र कडूस यांनी सत्ता राखली असून, त्यांच्या पत्नी आरती कडूस सरपंचपदी निवडून आल्या. गावातील सर्वपक्षीय विरोधकांचा कडूस यांनी पाडाव केला.
राळेगणमध्ये भाजपाचे सुधीर भापकर यांनी आपली सत्ता राखण्यात यश मिळविले. त्यांनी महाविकास आघाडीला धूळ चारली असून, सरपंचपदी दीपाली सुधीर भापकर निवडून आल्या. पांगरमलमध्ये सत्तांतर होऊन अमोल भरत आव्हाड यांनी सरपंच पदी बाजी मारली आहे. साकतमध्ये भाजपचा विजय झाला असून, येथे महाआघाडीला पराभवास सामोरे जावे लागले. सरपंचपदी नंदू दत्तू पवार विजयी झाले. बाबुर्डी बेंदमध्ये कर्डिले गटाचे रेवणनाथ चोभे यांच्या गटाला पराभवाचा धक्का बसला. मंदा सुनील खेंगट सरपंचपदी विराजमान झाल्या. बाजार समितीच्या माजी उपसभापती रेश्मा चोभे यांचा सरपंच निवडीत पराभव झाला असून, सदस्यपदी त्यांचे पती रेवणनाथ चोभे विजयी झाले.
वाळकी येथे ज्येेष्ठ नेते भाऊसाहेब बोठे यांनी सत्ता राखली आहे. येथील सर्वपक्षीय विरोधकांना धूळ चारत आपले वर्चस्व सिद्ध केले असून, शरद भाऊसाहेब बोठे सरपंचपदी निवडून आले. सोनेवाडी (चास ) येथे खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुरेश सुंबे यांनी सत्ता राखली आहे. उक्कडगाव येथे सरपंच नवनाथ म्हस्के, कापूरवाडी, नेप्ती, नांदगाव, शेंडी या बड्या ग्रामपंचायतींवर कर्डिले गटाचा बोलबाला दिसून आला. खातगाव येथे सेना -भाजप युतीचा विजय झाला. मदडगाव येथे भाजपचे अनिल शेडाळे यांची 10 वर्षांची गावची सत्ता शिवसेनेच्या साहेबराव शेडाळे यांनी उलथून टाकली.
आठवडमध्ये सरपंचपदी सविता सुनील लगड या अवघ्या दोन मतांनी विजयी झाल्या. ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन झाले. सरपंच निवडीत मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. सविता लगड यांना 455 मते मिळाली. तर, त्यांच्या प्रतिस्पर्धी लताबाई बाबासाहेब गुंजाळ यांना 453 मते मिळाली.
तालुक्यातील वाळकी, राळेगण, सारोळा कासार, दहिगाव या ठिकाणी सत्ताधारी गटाविरोधात सर्वपक्षीय दिग्गजांनी आघाडी करत आव्हान उभे केले. मात्र, सत्ताधारी गटाने आपले कौशल्य पणाला लावत, या आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळविले. त्यामुळे दिग्गजांच्या आघाडीचा बार फुसकाच ठरल्याचे या निवडणुकीत दिसले.
जखणगाव मधील वॉर्ड क्र.दोनमध्ये सुनील आबा धिरवडे व अरुण सूर्यवंशी यांच्यात लढत झाली. त्यात या दोन्ही उमेदवारां पेक्षा नोटाला जास्त मते मिळाल्याने विजय कोणाचा असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, दोन नंबरची मते मिळविणार्या सुनील धिरवडे यांना विजयी घोषित करण्यात आले.