अहमदनगर

Nagar : व्यावसायिक कराला भाजपचाही विरोध

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील व्यावसायिकांकडून व्यावसायिक आस्थापना कर लागू करण्यासाठी घेण्यात आलेल्या ठरावाला भाजपने विरोध दर्शवून निषेध नोंदविला आहे. या ठरावाला महापालिकेतील शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादीचे सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप करून भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी (दि. 6) महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेऊन तो ठराव रद्द करण्याची मागणी केली. माजी महापौर बाबासाहेब वाकळे, सचिन पारखी, महेश नामदे, प्रशांत मुथा, पंडित वाघमारे, दत्ता गाडळकर, सविता कोटा, बंटी ढापसे, रामदास आंधळे, मयूर ताठे, नितीन शेलार, मयुर बोचुघोळ, सतीश शिंदे, गोपाल वर्मा, रविंद्र बाकलीवाल, अनिल निकम, सुधीर मंगलारप, पुष्कर कुलकर्णी, बाळासाहेब गायकवाड, प्रकाश सैंदर, अनिल सबलोक, बाळासाहेब खताडे, भानुदास बनकर यावेळी उपस्थित होते.

शहरात आस्थापना कर लावण्यासाठी महापालिकेने मंजूर केलेल्या ठरावाच्या संदर्भानुसार दोन प्रकार वगळता नगरमधील सर्व आस्थापनेवर व्यवसाय कर आकारणीसाठी मंजुरी दिली. यापूर्वी कधीही असे जुलमीकर आकारले गेले नाही. हा कर व्यावसायिकांवर आकारला गेला, तर त्याचा आर्थिक बोजा सर्वसामान्य जनतेवर पडणार असून, नागरिकांना तो भुर्दंड सोसावा लागणार असल्याचे म्हणणे आहे.

महापालिकेतील शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादीच्या सत्ताधार्‍यांनी ठराव मे 2023 मध्ये संमत केला. परंतु, नगरमधील जनतेच्या आपेक्षांची पायमल्ली करून त्यांची एकप्रकारे फसवणूक या शिवसेना व राष्ट्रवादीच्या सत्ताधार्‍यांनी केली आहे. ठरावानुसार महापालिकेने 2006 मध्ये पारित केलेल्या राजपत्राचा संदर्भ दिला. त्यानंतर अनेक कर प्रणाली आली आहेत. प्रामुख्याने जीएसटी ज्यामध्ये इतर सर्व करांची विलिनीकरण करायचे आहे. महापालिकेला व्यावसायिक कर आकारण्यासाठी राज्य सरकारकडून मान्यता मिळालेली नाही. राज्यात कुठेही असा कर लागू नाही. हा कर लागू करण्यासंदर्भात महापालिकेने आस्थापनांकडून कोणत्याही सूचना व हरकती मागवल्या नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT