नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील सर्व कामे सोपी पण जन्म-मृत्यूचा दाखला मिळविणे सर्वांत किचकट. आता हिच प्रक्रिया सोपी होणार असून, मनपाच्या चारही प्रभाग समिती कार्यालयात जन्म मृत्यूचा दाखला मिळणार आहे आणि तोही तीन दिवसांत. तसा प्रस्ताव आरोग्य विभागाने आयुक्तांना दिला असून, आयुक्तांनी त्याला हिरवा कंदिल दिला आहे. लवरकच त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे सूत्रांकडून समजले. शहरातील कोणत्याही खासगी रुग्णालयात बाळ जन्माला आल्यानंतर त्याची रितसर मनपाकडे नोंद होणे अपेक्षित असते. त्यानंतर साधारण पाच दिवसांनी मनपाकडून दाखल मिळतो.
तसेच, कोणत्याही खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्यास अथवा शहरातील नागरिकाचा घरी मृत्यू झाल्यास त्याची रितसर मनपामध्ये नोंद करणे अपेक्षित असते. महापालिकेकडे नोंदणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीचा मृत्यू दाखला मिळतो. या प्रक्रियेमध्ये अनेक वेळा तांत्रिक अडचणी येतात. नागरिकांना जन्म आणि मृत्यूचा दाखल मिळविण्यासाठी अनेक दिवस मनपाच्या पायर्या झिजवाव्या लागत होत्या.
ही प्रक्रिया आणखी सुलभ पद्धतीने व्हावी आणि नागरिकांचा त्रास कमी व्हावा, यासाठी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याशी चर्चा करून जन्म-मृत्यूचे दाखल प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयनिहाय देण्याची योजना सुचविली. त्यास आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता नागरिकांना जन्म-मृत्यूची नोंद करण्यासाठी आणि दाखल मिळविण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागात जाण्याची गरज नाही. तर प्रभाग समितीच्या कार्यालयातच जन्म-मृत्यूचा दाखल मिळणार आहे.
मनपाने तो प्रस्ताव पुणे येथील जन्म-मृत्यू विभागाचे उपसंचालक तथा उपमुख्यनिबंधक यांच्याकडे पाठविला आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर शहरातील चार प्रभाग समिती कार्यालयामध्ये उपनिबंधकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजले.
सिव्हिलचा दाखल तिथचं
जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या बाळाचा जन्म दाखला पूर्वी मनपामध्ये मिळत होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र उपनिबंधकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये जन्माला आलेल्या बाळाचा जन्म दाखल सिव्हिलमध्ये मिळतो. त्यामुळे नागरिकांनी मनपाकडे चौकशी करू नये, असे ही सूत्रांनी सांगितले.
एकाच ठिकाणी जन्म आणि मृत्यूची नोंद करणे. त्याच कार्यालयातून नागरिकांना दाखलही दिला जात होता. त्यामुळे नोंद करणे आणि दाखला देणे या प्रक्रियेला विलंब होत होता. आता प्रभाग समिती कार्यालयातूनच दाखल मिळणार आहे. जन्म-मृत्यू नोंदणी व दाखल्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे.
-डॉ. अनिल बोरगे, वैद्यकीय अधिकारी, मनपा
खासगी रुग्णालयात लगेच दाखल
शहराच्या हद्दीत सुमारे 61 प्रसूति हॉस्पिटल आहेत. त्या सर्व हॉस्पिटल संचालकांची नुकतीच बैठक घेतली असून, त्यांना जन्म-मृत्यू दाखल्याबाबत सर्व प्रक्रिया समजावून सांगितली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात जन्म झालेल्या बाळाचा डिस्चर्ज वेळीच जन्म दाखल मिळणार आहे.