अहमदनगर

नगर : भिंगार कॅन्टोन्मेंटचा वाहन प्रवेश कर बंद

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : माल वाहतूक तसेच प्रवाशी वाहतूक करणार्‍या वाहनधारकांकडून अहमदनगर (भिंगार) छावणी परिषदेकडून वाहन चालकांकडून प्रवेश कर आकारला जात होता. हा बंद करण्यात यावा, यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार केंद्र सरकारने मंगळवारी रात्री उशिरा आदेश जारी करीत छावणी मंडळांचा वाहन प्रवेश कर बंद केला. त्यात 62 छावणी मंडळे असून, राज्यातील 7 छावणी परिषदांचा समावेश आहे.

भिंगार छावणी परिषदेकडून वाहन प्रवेश कर (व्हीईटी) व व्हीईएफ असे दोन प्रकारचे कर आकारले जात होते. भिंगार छावणी मंडळाकडून व्हीईटी कराची आकारणी केली जात होती. केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी व्हीईएफ कर बंद केला होता. मात्र, व्हीईटी कर सुरूच होता. वाहन करासंदर्भात केंद्र सरकारने स्थानिक संस्थेचा अभिप्राय मागविला होता. त्या संदर्भात छावणी परिषदेने वाहन कर रद्द करण्यासंदर्भात दोन महिन्यांपूर्वीच ठराव घेऊन पाठविला होता. त्यावर केंद्र सरकारने वाहन कर रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेतला असून, त्याची बुधवारी मध्यरात्रीपासून अंमलबजावणी सुरू होणार आहे.

भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीत येण्यासाठी वाहन कर रद्द करण्यासंदर्भात ठराव पाठविला होता. त्यावर केंद्र सरकारने निर्णय दिला असून, आजपासून वाहन कर बंद झाला आहे.
                                                        – वसंत राठोड, सदस्य, छावणी परिषद

SCROLL FOR NEXT