अहमदनगर

भातोडी, बारदरी, जांबचा तलाव ओव्हरफ्लो

अमृता चौगुले

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : सुमारे चारशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक भातोडीचा तलाव मंगळवारी सायंकाळी ओव्हरफ्लो झाला असून, या भातोडी तलावातील पाणी मेहेकरी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये आनंदनाचे वातावरण पसरले आहे. शहरापासून 16 किलोमीटरवर असलेला राजे शहाजी व शरीफजी यांच्या काळातील हा ऐतिहासिक भातोडी तलाव आजही भक्कम स्थितीत असून, सध्या या तलावात गाळाचे प्रमाण जास्त असूनही 14 दशलक्ष घनफूट पाणी साठा झाला आहे. तलावातील गाळ पूर्ण क्षमतेने काढल्यास या तलावात 37 दशलक्ष घनफूट पाणी साठण्याची क्षमता आहे.

भातोडी तलावाच्या लगत असलेला जांब-कौडगाव व चांदबीबी महालाच्या पायथ्याशी असलेला बारदरी येथील तलावही भरले आहेत. गेल्या चार-पाच दिवसात गर्भगिरी डोंगर पट्ट्यातील देवगाव, आगडगाव, रतडगाव, टोकेवाडी, रांजणी, माथणी, बाळेवाडी, कौडगाव, मेहेकरी नदीच्या उगम परिसरात झालेल्या दमदार पावसाने हे तीनही तलाव भरले आहेत.

नदीकाठ गावांना सतर्कतेचा इशारा
भातोडी तलावाचे पाणी सांडव्याद्वारे नदीपात्रात सोडले असल्याने, तलावालगतचे भातोडी, चिचोंडी पाटील, आठवड, विठ्ठलाचे नांदूर या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तेथील गावकर्‍यांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

सलग तिसर्‍या वर्षी भरले तलाव
सन 1991 पासून या भागात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तलाव भरत नव्हते. मात्र, सन 2020-21 आणि 22 या तीनही वर्षी झालेल्या जमदार पावसाने हे तलाव सलग तीन वर्षे ओव्हरफ्लो होत आहेत. याचा नगर तालुक्यातील पूर्व भागातील 12 ते 15 गावांना चांगला फायदा होत आहे.

चार गावांच्या तलावांत पाणी सोडा
भातोडी तलावाच्या लाभक्षेत्रात सांडवे, मांडवे, उक्कडगाव व दशमीगव्हाण या गावांचा समावेश होतो. या चारही गावांत यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे या गावांमधील तलाव अद्यापिक रिकामेच आहेत. त्यामुळे ओव्हरफ्लोचे पाणी कालव्याद्वारे सोडून या चार गावांमधील तलाव भरावेत, अशी मागणी तेथील शेतकर्‍यांनी केली आहे. दोन वर्षांपासून या तलावांत पाणी सोडण्यात येत असल्याने या गावांचा दुष्काळ हटला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT