देवदैठण : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्याच्या पश्चिमेकडील टोकाला असणार्या बेलवंडी फाटा ते बेलवंडी रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. यावरील डागडुजीसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च होतो; परंतु दरवर्षी हा रस्ता उखडतो. यामुळे दुरुस्तीच्या नावाखाली होणारा लाखोंचा खर्च खड्ड्यात जातो अशी परिसरातील नागरिकांची भावना आहे. महिलांनी आक्रमक पवित्रा घेत गांधीगीरी मार्गाने रस्त्यांवरील खड्ड्यांत बेशरमाचे झाड लावून निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे.
बेलवंडी, उक्कडगाव, पिंप्री कोलंदर, म्हसे, येळपणे, माठ, रायगव्हाण, राजापूर, ढवळगाव, अरणगाव, कोंडेगव्हाण, निंबवी, येवती, देवदैठण आदी गावांसाठी शिरूर बाजारपेठ मोठी असल्याने हा रस्ता विशेष दळणवळणाचा आहे. बेलवंडी फाटा ते बेलवंडी अंदाजे 25 ते 30 किमी. रस्त्यावर नेहमीप्रमाणे अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या कडा पूर्णत: उखडल्या असून, त्यावरून दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
खड्डे हुकवताना झालेल्या अपघातात जखमी होऊन काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. दुचाकीसह चारचाकी वाहनातून प्रवास करताना प्रवाशांसह चालकांचाही जीव मेटाकुटीला येतो. यामुळे संबंधित विभागाने या रस्त्याचे पक्के डांबरीकरण करावे, तसेच सध्या खड्डे बुजविण्याचे काम त्वरित आणि दर्जात्मक करावे, अन्यथा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका मीना आढाव, कुकडीच्या संचालिका विमल मांडगे, हिंगणी दुमालाच्या सरपंच सविता टिळेकर, गव्हाणेवाडीच्या उपसरपंच संगीता काळे, ढवळगावच्या सरपंच सारिका शिंदे, येवतीच्या सरपंच स्वप्नाली दिवटे, कोंडेगव्हाणच्या सरपंच संगीता मगर, चांभूर्डीच्या सरपंच वैशाली पूरी, सारोळा सोमवंशीच्या सरपंच उज्ज्वला आढाव, कोरेगव्हाणच्या सरपंच रुक्साना सय्यद, उक्कडगावच्या सरपंच राणी कातोरे, म्हसेच्या सरपंच सुवर्णा फाजगे, पिंप्री कोलंदरच्या सरपंच सोनाली बोबडे, माठच्या सरपंच सविता घेगडे, राजापुरच्या सरपंच प्रतीक्षा मेंगवडे, देवदैठणच्या माजी उपसरपंच पूजा बनकर आदींसह येळपणे गटातील शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन पुढील आठवड्यात या रस्त्यावरील खड्ड्यांत बेशरमाची झाडे लावून गांधीगीरी मार्गाने निषेध केला जाईल, असा इशारा पंचायत समितीच्या माजी सदस्या कल्याणी लोखंडे यांनी दिला.
अष्टविनायक महामार्गात समाविष्ठ असणार्या बेलवंडी फाटा ते बेलवंडी रस्त्यावर दरवर्षी खड्डे बुजविण्यासाठी वा रस्त्याच्या डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग लाखो रुपयांची मलमपट्टी करते. मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामाने काही दिवसातच पुन्हा रस्ते जैसे थे खड्डेमय होतात. त्यामुळे प्रशासनाने त्वरित व दर्जात्मक रस्त्याचे काम करावे अन्यथा येत्या दहा दिवसांत खड्ड्यांत बेशरमाची झाडे लावून गांधीगीरी मार्गाने निषेध केला जाईल.
– कल्याणी लोखंडे, माजी सदस्य, पंचायत समिती