अहमदनगर

नगर : साने गुरुजींमुळे वारकर्‍यांना पंढरी खुली : खासदार शरद पवार

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : कष्टकर्‍यांचा देव असलेल्या पांडुरंगाच्या मंदिरात दलितांना प्रवेश नव्हता, यासाठी साने गुरुजींनी दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन उभे केले. सनातनी व्यवस्थेविरुद्ध ते मजबुतीने उभे राहिले. पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार्‍या लाखो वारकर्‍यांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी चळवळ उभी केली, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले. साने गुरुजींनी विठ्ठल मंदिराचे दरवाजे दलितांना उघडे व्हावेत यासाठी तनपुरे महाराज मठात केलेल्या उपोषणाला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत.

यानिमित्त तनपुरे महाराज मठात उभारण्यात आलेल्या साने गुरुजी स्मारकाचा लोकार्पण सोहळा राष्ट्रसंत कुशाबा तनपुरे महाराज पुण्यतिथीनिमित्त पार पडला. या सोहळ्यात पवार यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. यावेळी मंचावर ह.भ.प. बद्रीनाथ तनपुरे महाराज, आमदार बबनराव शिंदे, पन्नालाल सुराणा, राजाभाऊ अवसक, माधव कारंडे, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, संभाजी दहातोंडे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, उपेंद्र टण्णू, भारत रामदास जाधव, ज्ञानेश्वर बंडगर आदी उपस्थित होते.

खासदार पवार म्हणाले, तो काळ देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचा काळ होता. अशा काळात विठ्ठल हा कष्टकर्‍यांचा देव असूनही त्यामध्ये लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येणार्‍या दलितांना प्रवेश नव्हता, त्यामुळे साने गुरुजींनी त्यावेळच्या मुंबई सरकारकडे पत्र लिहून मागणी केली. तसेच विठ्ठल देवस्थानच्या त्यावेळच्या पंच कमिटीकडे पत्रे लिहून लक्ष वेधले. शेवटी साने गुरुजींनी पंढरपुरात उपोषण केले. सनातनी व्यवस्थेविरुद्ध ते मजबुतीने उभे राहिले आणि मंदिर खुले झाले.

यावेळी बद्रीनाथ तनपुरे म्हणाले की, भाव तिथे देव आहे, मंदिरात देव आहेच, मात्र तो मंदिराच्या बाहेरही चराचरात आहे. संत नामदेवांनी हाच समतेचा विचार आणि वारकरी संप्रदायाची चळवळ भारतभर पोहोचवली. तनपुरे महाराजांनी संत गाडगेबाबांच्या आदेशाने पंढरपूरमध्ये अन्नदान चळवळ सुरू केली. पुढे समतेचा हा विचार समोर ठेवून साने गुरुजींच्या आंदोलनासाठी मठात जागा दिली. त्यातून दलितांना मंदिर प्रवेश देणारे ऐतिहासिक आंदोलन झाले. वारकरी संप्रदाय हा पुरोगामी चळवळ आहे.

याप्रसंगी आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की, त्याकाळी विठ्ठल मंदिरात विशिष्ट लोकांनाच प्रवेश होता, अशा कठीण काळात तनपुरे महाराजांनी साने गुरुजींना साथ दिली. यावेळी श्रीची विठ्ठल सहकाराचे अध्यक्ष अभिजित पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनीही मनोगते व्यक्त केली. साने गुरुजी यांच्या स्मारकासाठी बद्रीनाथ तनपुरे यांनी मठात जागा देऊन आपली विचारांशी असलेली बांधिलकी कायम ठेवली असल्याचे अवसक म्हणाले. मान्यवरांचे स्वागत अनंत बद्रीनाथ तनपुरे, प्रास्ताविक स्मारक समितीचे प्रमुख राजाभाऊ अवसक, तर प्रा. संदीप वाकचौरे यांनी सूत्रसंचालन केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT