अहमदनगर

नगर : डंपर चालक-मालकाची गुंडगिरी ; दुचाकीला धडक दिल्याचा जाब विचारल्याने पोलिसांना मारहाण

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : डंपर मागे घेताना पोलिसाच्या दुचाकीला धडक बसली. याची विचारणा करणार्‍या एलसीबीच्या दोन पोलिसांना डंपर मालक व चालकाने शिवीगाळ करत मारहाण केली. गुंडगिरी करणार्‍या तिघांवर कोतवालीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चितळे रोडवर गुरुवारी (दि.12) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल विजयकुमार बाळासाहेब वेेठेकर यांनी फिर्याद दिली आहे. अरुण भानुदास ढाकणे (रा. गणेशनगर, कल्याण रोड), गणेश शेषराव नागरे (रा.गाडगीळ पटांगण, नालेगाव) व आणखी एक अल्पवयीन मुलगा अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चितळेरोड पोलिस चौकी समोरील बांधकाम सुरू असलेल्या पत्र्याच्या गेटसमोर हेड कॉन्स्टेबल बबन मखरे फोन आल्याने दुचाकीवर बसून बोलत होते. तेथे बांधकामावर मुरूम टाकण्यासाठी आलेल्या डंपरने मखरेंच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे ते खाली पडले.
वेठेकर व मखरे यांनी ओळख देऊन चालकाला जाब विचारला असता, तुमच्यासारखे खूप पोलिस पाहिले असे म्हणत त्याने दोघांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चालकाने डंपर मालकाला बोलावून घेतले. डंपरमालक अरुण भानुदास ढाकणे हा तेथे आल्यानंतर त्याने वेठेकर यांच्या कानशिलात लगावली. तसेच इतर दोघांनी शिवीगाळ व दमदाटी केली. पुढील तपास कोतवालीचे सहायक पोलिस निरीक्षक विवेक पवार करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT