अहमदनगर

नगर : खबरदार, मुलींची छेडछाड कराल तर..!

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : शहराच्या विविध भागांत महिला व मुलींची छेडछाड करणार्‍या आणि विविध पद्धतीने त्रास देणार्‍या रोडरोमिओंकडे कोतवाली पोलिसांनी मोर्चा वळवला आहे. त्यामुळे आता महिला व मुलींनी फक्त तक्रार करायची, त्रास देणार्‍या 'त्या'चा बंदोबस्त झालाच म्हणून समजा. अशा काही रोडरोमिओंना नुकताच पोलिसांनी चोप देऊन, 18 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे महिला व मुलींनी, खास करून मुलींच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

शहराच्या विविध भागांत महिला व मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत. त्याची गंभीर दखल कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घेतली असून रोडरोमिओंवर कारवाईचा बडगा उगारला आहे. वाडिया पार्क व परिसरात राहणार्‍या, तसेच फिरायला येणार्‍या-जाणार्‍या महिला, कोचिंग क्लासेससाठी येणार्‍या मुलींना रोडरोमिओंकडून सातत्याने त्रास दिला जात होता. वेगात मोटारसायकल चालविणे, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, रस्त्यावर वाहने उभी करून वाढदिवस साजरे करत गोंधळ घालणे, वाडिया पार्क परिसरात दारू पिणे, तेथेच बाटल्या फेकणे आणि मुलींवर व त्यांना घ्यायला आलेल्या पालकांवरही पाणी फेकणे असे प्रकार सर्रास सुरू होते. याबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या.

या तक्रारींची दखल घेऊन निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदारांनी वाडिया पार्क, टिळक रोड भागात या भागात विनाकारण फिरणार्‍या, गोंधळ घालणार्‍या काहींना समज दिली, काहींची धुलाई केली. त्यातील 18 तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हेे दाखल केले. पोलिस अंमलदार गणेश धोत्रे, सतीश भांड, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, अभय कदम, संदीप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, श्रीकांत खताडे, अतुल काजळे, अशोक कांबळे, अशोक सायकर यांनी या कारवाईत भाग घेतला.

महिला-मुलींसाठी हेल्पलाईन
महिला व मुलींच्या मागे फिरणे, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्रामवर वारंवार मेसेज करणे, असा कोणत्याही प्रकारे तरुणांनी त्रास दिल्यास कोतवाली पोलिस ठाण्याच्या 0249/2416117 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा पोलिस निरीक्षक यादव यांच्या 7777924603 या क्रमांकावर टेक्स्ट, व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करून तक्रार करावी.

SCROLL FOR NEXT