अहमदनगर

राहुरीत 11 सरपंचांसाठी 88 जणांचे गुडघ्याला बाशिंग !

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा ज्वर चांगलाच तापला आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी गाव पुढार्‍यांसह ग्रामस्थांची जत्राच दिसून आली. रात्री उशिरापर्यंत उमेदवारी ऑफलाईन दाखल करण्याची मूभा दिल्यानंतर 11 ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त सरपंच पद मिळविण्यासाठी 88 जणांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे दिसले. तनपुरे-विखे-कर्डिले समर्थक ग्रामपंचायतींमध्ये वर्चस्वासाठी भिडणार आहे.

उमेदवारी भरण्याचा अखेरचा दिवस तर गाव पुढार्‍यांचा आपल्या पॅनलच्या इच्छुकांचा अर्ज दाखल व्हावा यासाठी सुरू असलेली पराकाष्ठा राहुरी महसूल कार्यालयामध्ये दिसली. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आलेल्या अडचणी लक्षात घेता प्रशासनाने ऑफलाईन पर्याय खुले केले. ऑनलाईनच्या फंद्यातून सुटलेल्या इच्छुकांना ऑफलाईनचाही अधिक त्रास सहन करावा लागला. सर्व कागदपत्रांची पुर्तता तसेच लेखी अर्ज भरताना अनेकांच्या नाकीनऊ आल्याचे चित्र आहे. तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनामध्ये निवडणूक यंत्रणेने इच्छुकांचे अर्ज स्विकारले. आरडगाव ग्रामपंचायतीमध्ये चांगलीच चुरस दिसून आली आहे.

लोकनियुक्त सरपंच व्हावे म्हणून सर्वाधिक 18 जणांनी इच्छा दर्शविली तर सदस्य पदासाठी 70 इच्छूक मैदानात अवतरले आहे. ब्राम्हणगाव भांड हे बिनविरोध निवडणुकीच्या दिशेने पाऊले टाकत असून तेथे केवळ एकाच उमेदवाराने सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला तर सदस्य पदासाठी 16 अर्ज आले आहे. केंदळ खुर्द ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी 4 तर सदस्य पदासाठी 29 अर्ज आलेेले आहे. प्रवरा पट्यातील सर्वांचे लक्षवेधी ठरणारे सोनगाव ग्रामपंचायतीच्या लढतीत 10 इच्छूक सरपंच उमेदवार तर सदस्य पदासाठी 49 अर्ज दाखल झाले आहे. ताहाराबाद ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी 4 इच्छूक तर सदस्य पदासाठी 33 जणांनी अर्ज दाखल केले आहे. तुळापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 3 तर सदस्य पदासाठी 20 जणांनी अर्ज दाखल केले आहे.

कोल्हार खुर्द ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी 15 जणांनी तर सदस्य पद मिळविण्यासाठी 70 अर्ज दाखल झाले आहे. खडांबे खुर्द ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी 4 तर सदस्य पदासाठी 36 अर्ज दाखल झालेले आहेत. कोंढवड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 12 जणांनी तर सदस्य पदासाठी 71 अर्ज दाखल झालेले आहेत. मांजरी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी 5 तर सदस्य पदासाठी 35 अर्ज, मानोरी येथे सरपंच पदासाठी 12 तर सदस्य होण्यासाठी 64 जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. ब्राम्हणगाव भांड ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी सविता राजेंद्र पवार यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता निश्चित आहे.
ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी सायंकाळच्या सत्रामध्ये एकच झुंबड उडाली होती. अर्ज भरताना गाव पुढार्‍यांचा तांडा आपल्या पॅनलच्या उमदेवारांचा अर्ज भरून घेण्यासाठी खडा पहारा देत असल्याचे दिसून आले.

गाव पुढार्‍यांवर हात जोडण्याची वेळ !
बहुतेक ग्रामपंचायतीमध्ये इच्छुक उमेदवारांची वाढलेली संख्या ही गाव पुढार्‍यांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. उमेदवारी माघारीसाठी केवळ दोन दिवसाचा अवधी आहे. काही करा परंतु अर्ज मागे घ्या म्हणण्याची वेळ गाव पुढार्‍यांवर येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT