अहमदनगर

नगरमध्ये डीएड, टीईटीची सौदेबाजी ? अधिकार्‍याच्या व्हिडिओ क्लिपने राज्यात उडाली खळबळ

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : 'डी.एड.'सह 'टीइटी' परीक्षेसाठी एका अधिकार्‍याकडूनच सौदेबाजी सुरू असलेली एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. नगर जिल्हा हा वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत असतो. मागील टीइटी घोटाळ्याचे कनेक्शनही नगरपर्यंत पोहचले होते. त्यानंतर नुकताच बारावीचा परीक्षेतील गणिताचा पेपर फुटीप्रकरणी रुईछत्तीशी येथून प्राचार्यांसह पाच जणांना मुंबई क्राईम बॅचने उचलल्याची घटना अजूनही ताजीच आहे.

त्यातच दोन दिवसांपूर्वी रात्री व्हायरल झालेली एक व्हिडिओ क्लिप दै. पुढारीच्या हाती लागली आहे. यामधील संवाद शिक्षण क्षेत्रातील 'बाजारा'चे दर्शन घडविणारा आहे. या क्लिपमध्ये डीएडच्या परीक्षेसाठी रायटर, तसेच आठ विषय सोडविण्यासाठी एका शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यानेच 'सौदेबाजी' केल्याचे दिसत आहे.

तर, दुसर्‍या बाजूने अधिकार्‍याशी सौदा करणारा 'तो' व्यक्ती देखील एक प्रशासकीय कर्मचारीच असून, तो आपल्या कुटुंबातील व्यक्तीसाठी ही सौदेबाजी करत असल्याचे पुढे आले आहे. याशिवाय शिक्षण विभागाच्या 'त्या' अधिकार्‍याने डीएडनंतर टीईटीचेही काम करून देतो, असे सांगून त्यासाठी सिस्टीममधील तीन लाखांचे फिक्स रेटकार्ड व ते कोणाकडे द्यायचे, हेही सांगून टाकले आहे.

दरम्यान, शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारा हा व्हिडिओ वरिष्ठांकडेही पोहचला असून, याप्रकरणी चौकशी सुरू झाल्याचीही खात्रीशीर माहिती मिळाली आहे. त्यामुळे लवकरच हा व्हिडिओ कधीचा, 'ते' दोन अधिकारी कोण, नेमका 'हा' प्रकार काय? अशा अनेक प्रश्नांचे उत्तरे मिळणार आहेत.

दिवाळीला मीही 'इतके' देतो !
शिक्षण विभागाच्या अधिकार्‍याशी सौदेबाजी करणारा 'तो' दुसरा इसम देखील प्रशासकीय कर्मचारीच आहे. त्याच्या संवादातूनही मी फक्त दिवाळीलाच 'एका' वरिष्ठाला 'इतके' रुपये देतो, असे सांगत असल्याचे ऐकायला मिळते. त्यामुळे नगरचे प्रशासन खरोखरच पोखरले गेले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नगरची संबंधित व्हिडिओ क्लिप शुक्रवारी रात्री 10.30 वाजता माझ्याकडे आली आहे. याविषयी तत्काळ शिक्षणाधिकारी यांना सूचना केल्या आहेत.

                                 -महेश पालकर, राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT