अहमदनगर

नगर : थकित कर्जदार शेतकर्‍यांचे खाते बँकांनी गोठविले

अमृता चौगुले

उंबरे (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  कर्जाचे हफ्ते थकल्याने अनेक बँकांनी शेतकर्‍यांची खाते गोठविल्याने शेतकर्‍यांची मोठी तारांबळ उडालेली आहे. पैशांची आवक-जावक थांबल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आलेले आहे. शेतकर्‍यांसमोर एकापाठोपाठ अनेक संकटे उभी राहिल्याने शेतकर्‍यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकलेले नाही. हा शेतकर्‍यांचा दोष नसून अस्मानी संकटामुळे हे सर्व झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुर्नगठण करून त्यांची खाते सुरू करावीत, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
आधी कोरोनाचा काळ, त्यानंतर अतिवृष्टी, शेतीमालाला व दुधाला भाव नाही. कांदा ही फेकून देण्याची वेळ आली. अशा चौफेर संकटातून सापडलेल्या शेतकर्‍यांना आज पुन्हा एकदा बँकेने संकटात ओढण्याचे काम केले आहे.

आपल्या पोटाला चिमटा घेऊन एक- एक रुपया जमा करून बँकेमध्ये शेतकर्‍याने ठेवला होता. आपल्या मुला- मुलींचे शिक्षण, पिकांसाठी लागणारे औषधे, मटेरियल याचे नियोजन करून पैसे ठेवले होते. परंतु जेव्हा पैशाची गरज असताना बँकेने मात्र त्याचे खाते गोठवल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकट शेतकर्‍यांना ओढवले आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी बँकांमध्ये चकरा मारून मारून थकला आहे. बँक कर्मचारी व व्यवस्थापक शेतकर्‍यांना सांगतात की, अगोदर पैसे भरा तरच तुमचे बँक खाते सुरू होईल. त्यामुळे थोडेफार असलेले बँकेमधील पैसे शेतकर्‍यांना काढता येत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मुलांचे शिक्षण विवाह व शेतीची कामे थांबली आहेत. सध्याला शेतकरी कापूस, सोयाबीन व इतर पिकांच्या मशागती बरोबरच लागवडीच्याही तयारीत आहे. काहींनी लागवड केलेली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना पैशाची गरज असताना बँकेच्या पठाणी कारभराविरुद्ध शेतकरी तीव्र नाराज असून याबाबतीत लवकरात लवकर निर्णय न झाल्यास याचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना न्याय देणे ऐवजी शेतकर्‍यांकडून जबरदस्तीने बँक खाते बंद करून व बँक खात्यातील पैसे काढण्यास मज्जाव करणार्‍या बँकांवर कारवाई करावी व शेतकर्‍यांना त्यांचा घामाचा पैसा वेळेवर मिळावा, हीच मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

पत्नीचे मंगळसूत्र मोडून भरले बिल
राहुरी तालुक्यातील एका शेतकरी आपल्या मुलीच्या प्रसुतीसाठी दवाखान्यामध्ये घेऊन गेला असता डॉक्टरांनी त्या शेतकर्‍यांना अगोदर पैसे भरण्यास सांगितले. बँकेमध्ये पैसे असल्याने तो शेतकरी बँकेमध्ये गेला असता कर्ज थकित असल्याने त्याचे खाते गोठविण्यात आले असल्याचे बँकेच्या कर्मचार्‍यांनी सांगितले. बँकेच्या खात्यात पैसे असूनही आपणास मिळत नसल्याने त्याने बँकेतच टाहो फोडला. एकीकडे मुलगी मृत्यूशय्येच्या दारात, डॉॅक्टरांनी पैशांची केलेली मागणी, तिसरीकडे पैसे असूनही मिळत नसल्याने त्याने त्याचा आश्रूचा बांध फुटला.या संकटकाळी काय करावे, हे त्याला सुचेना. एनवेळी पैसे आणयाचे कोठून असा यक्ष प्रश्न त्याच्यासमोर उभा होता. अखेर आपल्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसुत्र मोडून इतरांकडून मदत घेत त्याने डॉक्टरांची रक्कम अदा केली. अशाच समस्या इतरही शेतकर्‍यांपुढे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT