दहिगावने(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : परिसरातील शहरटाकळी भावीनिमगाव, सुलतानपूर परिसरात अचानक सुटलेल्या सुसाट वादळी वार्याने झाडे विजेच्या खांबावर पडली. यामुळे वीजपूरवठा खंडित झाला. तर, राजणीतील शेतकर्याची केळीच्या बागेतील केळीची झाडे उन्मळून पडली. बाग भुईसपाट झाल्याने शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दहिगावने येथील आठवडे बाजारात आचानक सुटलेल्या वार्यांने व्यापारी व शेतकर्यांच्या भाजीपाल्याचे दुकानाचे पाल उडवून गेले. यामुळे व्यापारी व शेतकर्यांचे हाल झाले. त्यामुळे शेतकर्यांचा माल तसाच पडून राहिल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दहिगावने – शेवगाव रस्ता व कुकाणा रस्तावर झाडे आडवी पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
शेतात साठवेलेल्या कांदा झाकण्यासाठी शेतकर्यांची धावपळ उडाली. वादळाने महावितरणाच्या वीज कनेक्शनच्या तारा खाली लोंबकळत आहे. अनेक ठिकाणी विद्युत पोल पडले असून, काही ठिकाणी ताराही तुटल्या. यामुळे काही काळ वीजपूरवठा बंद होता.
भावीनिमगाव, शहरटाकळी येथे अनेक घरावरील छत उडवून गेले. तर, शेवगाव तालुक्यातील रांजणी येथील शेतकरी बाबासाहेब दत्तू माताडे यांच्या दोन एकर केळी, आबासाहेब दत्तू माताडे यांच्या दोन एकर केळी, कैलास सदाशिव कर्डिले यांची एक एकर केळी, तर अशोक दगडू उगले 30 गुंठे केळी, ज्ञानेश्वर निवृत्ती गायके यांच्या चार एकर केळी, भगवान भानुदास चव्हाण यांच्या तीन एकर केळी पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकर्यांचे ऊस पीक जमीनदोस्त झाले. तर, फळबागेचेही नुकसान झाले.