अहमदनगर

श्रीरामपूर : उत्तरेमध्ये गारांसह ‘अवकाळी’चे थैमान; बळीराजा हवालदिल

अमृता चौगुले

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान मांडले आहे. काल (शनिवारी) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक गारांसह अवकाळी पाऊस धारा कोसळल्यामुळे शेतकर्‍यांची अक्षरशः धावपळ उडाल्याचे चित्र दिसले. दरम्यान, अवकाळीमुळे बहुतांश शेतकर्‍यांच्या गहू, कांदा, हरभरा, मका, घास पिके आडवी झाल्याने आभाळातल्या अवकाळी पाण्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे! श्रीरामपूरसह राहुरी, राहाता, संगमनेर, कोपरगाव व अकोले तालुक्यात अवकाळीने थैमान मांडले आहे. अगोदर शेतमालाला भाव नसल्याने आर्थिक अवकाळी ओढवली असताना आता गारांसह नैसर्गिक अवकाळी पाऊस पडत असल्याने बळीराजा हवालदिल झाल्याचे बिकट चित्र दिसत आहे.

शिरसगाव : श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगावसह परिसरात गारांसह पाऊस पडल्याने शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. जोरदार वादळाने थैमान घातले. यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती गणेश मुदगुले यांनी दिली. हरेगाव, उंदिरगाव परिसरात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. रस्तेसुद्धा संध्याकाळपर्यंत कोरडे होते, असे सरपंच सुभाष बोधक, सुभाष पंडित यांनी सांगितले. वादळ, वार्‍यासह गारांच्या पावसाने श्रीरामपूर सिद्धिविनायक मंदिराजवळ मोठ्या झाडाची फांदी कमाणीवर पडुन मोठे नुकसान झाले. सुदैवाने काही जिवीत हाणी झाली नाही. झाडाखाली उभ्या नव्या रिक्षाचे नुकसान झाले. हा रस्ता रहदारीचा असल्याने वाहतुक बंद झाली. प्रशासनाने ठिक-ठिकाणी रस्त्याच्याकडेच्या धोकादायक झाडांच्या फांद्या काढून संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी अशोक कटारे यांनी केली आहे.

राजुरी : राजुरी व ममदापूर परिसरात शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक गारांसह अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकर्‍यांची धावपळ उडाली.अवकाळी पावसामुळे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. राहाता तालुक्यातील राजुरी, ममदापूर परिसरात दुपारी गारांसह अवकाळी पाऊस पडला. ममदापूर येथे आठवडे बाजार असल्यामुळे बाजारकरुंची मोठी तारांबळ उडाली. गारा इतक्या मोठ्या होत्या की, त्या पडताच दगडा मारल्यासारखा आवाज येत होता. अनेक गाड्यांवर टपोर्‍या गारा पडल्यामुळे काही गाड्यांचे नुकसान झाले. शनिवारी दुपारी 2 वाजल्यापासून ढगाळ हवामान झाले होते. सध्या शेतकर्‍यांची हार्वेस्टरच्या साह्याने गहू काढण्याची लगबग सुरू आहे. अनेक शेतकरी हार्वेस्टर मशीन गहू काढण्यास शेतात कसे येतील, यासाठी दिवसभर मशीनवाल्यांमागे फिरताना दिसत होते. अशात अचानक अवकाळी पावसामुळे आणखी तारांबळ उडाली. शेतात गहू, मका, द्राक्ष बागा, कांद्याला गारांसह अवकाळी पावसाचा तडाखा बसला.

टाकळीभान : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान दुपारी 4.30 वाजेच्या दरम्यान वादळ, वार्‍यासह अवकाळी पाऊस पडला. गहू, मका, कांदा आदी पिके भुईसपाट झाली. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. गेल्या दोन दिवसांपासून येथे अवकाळी पाऊस सुरू आहे, मात्र काल रात्री व (दि.18) रोजी अर्धा तास वादळ, वार्‍यासह जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने उभी पिके भुईसपाट झाली. सध्या रब्बी हंगामातील शेतकर्‍यांचे गहू पिक उभे आहे. पिके काढणीस आली. कांदा, मका आदी पिकांना अवकाळी पावसाने मोठा फटका बसला.
नुकसानीचे प्रशासनाने पंचनामे करावे, अशी मागणी शेतकर्‍यांमधून करण्यात आली आहे. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करण्याची सुचना तहसीलदार प्रशांत पाटील यांनी कृषी अधिकारी यांना केली आहे.

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील पिंपळगाव, देपा, वरुडी पठार, कर्जुले पठार या गावांसह करुले निळवंडे या गावांमध्ये अवकाळी पावसासह गारा पडल्या. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागात शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास गारपीट सुरू झाली. साधारणतः पाऊन तास गारपीट सुरू होती. साकुर फाटा, कजुले पठार, चंदनापुरी घाट परिसरासह करुले निळवंडे या परि सरात गारपीट झाली. नाशिक-पुणे महामार्गावर गारांचा खच पडलेला पहायला मिळाला. शेतात सगळीकडे गारा पडलेल्या दिसल्या. बोरांच्या आकाराच्या गारा पडत होत्या. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले. काढणीला आलेला शेतमाल खराब झाला. टोमॅटोचे मोठे नुकसान झाल्याचे पठार भागात शेतकर्‍यांनी सांगितले.

शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी..!
कांद्यास भाव नसल्यामुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी दिसत आहे. अशा बिकट परिस्थितीत गारांसह आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गारांसह अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT