अहमदनगर

नगर तालुका : अवजार एक; शेतीची कामे अनेक..! राज्यातील पहिलाच प्रयोग

अमृता चौगुले

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा: नगर तालुक्यातील निंबळक येथील शेतकर्‍यांने शेतीसाठी उपयोगी नवीन अवजार बनवले आहे. 'त्या'अवजाराची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. नवीन अवजार अनेक कामे एकट्याने करत असून, शेतकर्‍यांसाठी फायदेशीर आहे. यातून वेळ आणि पैसाही वाचतो आहे. निंबळक येथील शेतकरी नवनाथ सूर्यभान घोलप शेतीबरोबर ट्रॅक्टर चालवताना शेतीच्या मशागतीसाठी काकर्‍या, पाळी, पेरणी, पणजी, रोटा, नांगरट करताना प्रत्येक वेळी वेगळी अवजारे जोडावी लागत होती.

प्रत्येक वेळी शेतात ट्रॅक्टर घातल्याने ओल्या जमिनीत तुडा-तुडवीचे प्रमाण वाढते. त्यामुळे या सर्वांवर मात करत एकाच अवजाराने ही सर्व कामे करता आली, तर शेतकर्‍यांना फायदा होईल, या विचाराने प्रेरित होऊन नवनाथ घोलप यांनी अशा प्रकारचे अवजार बनविण्याचा संकल्प केला.  55 एचपीच्या पुढील ट्रॅक्टरसाठी लागणारे अवजार 55 हजार रुपये किमतीला, तर 35 एचपीच्या ट्रॅक्टरसाठी लागणारे अवजार 45 हजार रुपये किमतीला विक्रीसाठी देण्यात येत आहे.

इतर कंपन्यांच्या अवजारांपेक्षा या अवजाराची किंमत अत्यल्प आहे. शेतीच्या मशागतीसाठी लागणार्‍या खर्चात देखील बचत होते. अवजार पाहण्यासाठी जिल्ह्यातून लोक येत आहेत. नवनाथ घोलप यांनी बनविलेल्या या अवजाराची जिल्ह्यात चर्चा सुरू असून, घोलप यांचा सत्कार युवा नेते अजय लामखडे, घन:श्याम म्हस्के, बाबासाहेब लामखडे, संतोष गेरंगे, सागर कोतकर, अरूण धामणे, दत्तू निमसे, तेजस कर्डिले, गणेश कर्डिले, सतीश गेरंगे आदींनी केला.

संशोधनासाठी लागली तीन वर्षे
काकर्‍या, पाळी, पेरणी, पणजी, रोटा, नांगरट ही सर्व कामे एकाच अवजाराने होतील, असे अवजार बनविण्यात आले असून, त्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागला असल्याचे घोलप यांनी सांगितले. या अवजारामुळे सर्व कामे एकाच वेळी होत असल्याने वारंवार ट्रॅक्टर शेतात घालावा लागत नाही. तसेच, बैलाच्या नांगरटीप्रमाणे रान पलटी होत असल्याने शेतात चढ-उतार होत नाही. पर्यायाने मृदा संधारणासाठी अवजार फायदेशीर ठरत आहे.

शेती व ट्रॅक्टर चालवता चालवता नवनवीन प्रयोग करण्याचा मला छंद आहे. त्यातून शेतकरी हितासाठी हे नविन अवजार बनविण्यात आले आहे. या अवजारामुळे शेतकर्‍यांचा फायदा होणारच त्याचबरोबर मलाही काही प्रमाणात आर्थिक मदत होणार आहे.
                                                                -नवनाथ घोलप, शेतकरी, निंबळक

ग्रामीण भागातील नवनाथ घोलप यांनी बनविलेले शेतीसाठीचे अवजार अप्रतिम असून शेतकरी हिताचे ठरत आहे. या अवजारामुळे शेतकर्‍यांना निश्चितच फायदा होणार आहे. त्यांच्यातील कलेला वाव मिळण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार आहे.
                                                                     -अजय लामखडे, युवा नेते

एकरी इंधनाचीही बचत
एकरी इंधनही फारच कमी लागते. राज्यातील पहिलेच अवजार बनविण्यात आल्याची माहिती घोलप यांनी दिली. सध्या अवजाराचा वापर करत असून, चार महिन्यात 1500 रुपये एकर प्रमाणे 510 एकर क्षेत्राची मशागत केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT