नगर; पुढारी वृत्तसेवा : दारू न पाजल्याच्या रागातून बिगारी काम करणार्या कामगाराला चौघांनी चाकूने व चॉपरने वार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी चौघांवर कोतवाली पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय भनगडे, संदीप राजापुरे (दोघे रा. बोहरी चाळ रेल्वेस्टेशन), पिंटू माघाडे (रा. डॉनबॉस्को), मनोज ठाकूर (रा. महात्मा फुले वसाहत, संजयनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
महेश गोरख आठवले (रा. रेल्वे कॉलनी, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. आठवले शनिवारी (दि.7) रात्री कायनेटिक चौकातील हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. तेथे चारही आरोपी आले. 'आम्हाला तू आता तुझ्या खर्चाने दारू पाज' असे ते म्हणाले. आठवले यांनी पाजण्यास नकार दिला. जेवण करून हॉटेलच्या बाहेर आले असता चौघांनी शिवीगाळ करत आठवले यांच्यावर हल्ला केला. विजय भनगडे याने चाकूने गळ्यावर वार करून आणि संदीप राजापुरे याने चॉपरने डोक्यात वार करून आठवले यांना जखमी केले. तसेच पिंटू माघाडे व मनोज ठाकूर या दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.