अहमदनगर

नगर : जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपीस 5 वर्षे शिक्षा

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  तलवारीने डोक्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीला 5 वर्षे कैद व 8 हजार दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायाधीश एम. एस. शेख यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.  महेंद्र बाजीराव महानोर (रा. डोमाळवाडी वांगदरी ता.श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नावे आहे. वांगदरी शिवारात 17 मार्च 2022 रोजी आरोपी महेंद्र बाजीराव महानोर याने, तुझ्या चुलत बहिणीने माझ्या विरूद्ध केलेली केस मिटवून का घेत नाही, असे म्हणत फिर्यादीच्या डोक्यावर हातातील तलवारीने वार केले होते. याबाबत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीविरूद्ध श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस उपनिरीक्षक अमित प्रविण माळी यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये जखमी साक्षीदार, फिर्यादी, फिर्यादीची पत्नी, वैद्यकीय अधिकरी, तपासी अधिकारी व पंच यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व सरकारी वकील अ‍ॅड. संगिता अनिल ढगे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.  तर, आर्म अ‍ॅक्टच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. संगीता ढगे, अ‍ॅड. अनिल घोडके व अ‍ॅड. एम. पी. कुलकर्णी यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी एस. एस. फलके यांनी सहकार्य केले.

SCROLL FOR NEXT