नगर; पुढारी वृत्तसेवा : शहरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना गंभीर असून, विशिष्ट लोकांकडून दहशत परविण्याचा प्रयत्न होत असल्याचे मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडले. तसेच शहरात मोठ्या प्रमाणात असलेल्या अतिक्रमणामुळे व अनधिकृत व्यवसायांमुळे गुन्हेगारीला बळ मिळत आहे. अतिक्रमण व अनधिकृत व्यवसायांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश महानगरपालिका व पोलिस प्रशासनाला देण्यात आल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
कापड बाजारातील दोन व्यापार्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे व्यापारी वर्गातून असंतोष व्यक्त होत आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेले व्यापारी दीपक नवलाणी यांची रविवारी (दि.16) भेट घेऊन विखे पाटील यांनी प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद सांधला. गेल्या काही दिवसांतील घटनांबाबत विखे पाटील म्हणाले, "वैयक्तिक वाद असले तरी विशिष्ट लोकांकडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.
अशा घटनांचा मुख्य सूत्रधार चौकशीतून समोर येईलच. त्यानंतर त्यांच्याबाबत उपाययोजना करण्यात येईल." विखे यांनी हल्लेखोरांवर कडक कारवाईचे निर्देश दिले. तसेच अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाकडून संबंधितांना आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर अतिक्रमण काढण्यासाठी कडक कारवाई होणार असल्याचे विखे यांनी सांगितले.
महानगरपालिकेची अनास्था
शहरासह उपनगरांमध्ये असलेले अतिक्रमण काढण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु, महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाई का होत नाही? असा प्रश्न पालकमंत्र्यांनी उपस्थित केला. महानगरपालिकेच्या कामात अनास्था दिसून येत असल्याचे विखे पाटील म्हणाले.
आमदार अन् महापौर भाजपचा होईल
येणार्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहणार आहे. तसेच येत्या काळात नगर शहराचा आमदार आणि महापौर भारतीय जनता पक्षाचेच असतील, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.