वाळकी : पुढारी वृत्तसेवा : भांडण झाल्याने माहेरी आलेल्या पत्नीस नांदवायला पाठविण्यास नकार दिल्याने एकाने सासूवर चाकूने वार करीत पत्नी व मेव्हुण्यालाही बेदम मारहाण केली. नगर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे रविवारी (दि.2) पहाटे ही घटना घडली.
याबाबत महिलेने नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. या महिलेच्या मुलीचा विवाह आष्टी तालुक्यातील लोणीसय्यदमीर येथील भरत मच्छिंद्र माळी याच्याबरोबर झाला आहे. मात्र, मुलीला पती व सासरचे वारंवार मारहाण करीत असल्याने ती कोल्हेवाडी येथे माहेरी आली.
रविवारी (दि.2) पहाटे फिर्यादी महिलेचे कुटुंबीय घरात झोपले असताना घराचा दरवाजा वाजू लागल्याने दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा दारात आरोपी भरत मच्छिंद्र माळी, त्याचे वडील मच्छिंद्र माळी व आई संगीता मच्छिंद्र माळी (सर्व रा.लोणी सय्यदमीर ता. आष्टी जि. बीड) उभे होते. एवढ्या रात्री घरी का आलात, अशी विचारणा करता भरत माळीने पत्नीला मुलांसह घेऊन जाण्यासाठी आल्याचे सांगितले. मुलीला मारहाण होत असल्याने तिला पाठविणार नसल्याचा सांगितल्याने संगीता माळी हिने शिवीगाळ केली. मच्छिंद्र माळीने मारहाण सुरू केली. मध्यस्थीस गेलेल्या फिर्यादी महिलेवर चाकूहल्ला केला.
तसेच इतरांना काठीने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत नगर तालुका पोलिसांनी भरत मच्छिंद्र माळी, मच्छिंद्र माळी व संगीता मच्छिंद्र माळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.