अहमदनगर

नगर : तांदूळ संपला; खिचडी बंद..! फेब्रुवारीचा कोटा येईना !

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शासनाकडून शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना तांदूळाची खिचडी दिली जाते. मात्र, सध्या अनेक शाळांचा तांदूळच संपल्याने मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे. पोषण आहार विभागातून शिक्षण संचालकांकडे दोन वेळा पत्रव्यवहार करूनही फेब्रुवारी अर्धा संपला, तरीही अद्यापि नवीन तांदूळ वाटप आदेश झालेले नाहीत.

पाचवी ते आठवीपर्यंतच्या मुलांना शाळेत तांदूळ खिचडीचा पोषण आहार दिला जातो.जिल्ह्यात साधारणतः 4 लाख 79 हजार विद्यार्थी हे पोषण आहाराचे लाभार्थी आहेत. या मुलांसाठी दर दोन महिन्यांचा तांदूळाचा कोठा शाळांना वाटप केला जातो. यापूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचा कोठा शाळांना प्राप्त झालेला होता.

पोषण आहाराचा पुरवठादार बदलण्यासाठी शासनस्तरावरून हालचाली सुरू आहेत. यापुढे दर दोन महिन्यांचा नव्हे, तर दोन वर्षांसाठी ठेकेदाराला काम दिले जाणार आहे. हा ठेकेदार अजूनही निश्चित झालेला नसल्यानेच अद्यापि फेब्रुवारीचा तांदूळ शाळेपर्यंत पोहचू शकलेला नाही. कदाचित अजूनही महिनाभर हे भिजत घोंगडे कायम राहील, अशीही भिती वर्तविली जात आहे. दुसरीकडे काही शाळांमध्ये तांदूळ शिल्लक असला तरी तो आठ दिवसांत संपणार असल्याने ही ओरड वाढणार आहे.

पाचवीपर्यंत 100; सहावीपुढे 150 ग्रॅम !
कार्यदिवसांप्रमाणे पहिली ते पाचवीपर्यंत प्रतिविद्यार्थी 100 ग्रॅम आणि सहावी ते आठवीपर्यंत 150 ग्रॅमप्रमाणे तांदूळ शिजविला जातो. मात्र जानेवारी संपल्यानंतर अनेक शाळांमधील हा तांदूळ संपला आहे. त्यामुळे फेब्रुवारी अणि मार्च या दोन महिन्यांचा तांदूळ कोठा मिळावा, अशी मुख्याध्यापकांची मागणी आहे. मात्र, फेब्रुवारी निम्मा उलटला, तरीही अद्यापि अनेक शाळांमध्ये नवीन तांदूळ पोहचलेला नाही. त्यामुळे 'त्या' शाळांमध्ये खिचडी शिजणे बंद झाले आहे. परिणामी, मुलांना शाळेत मिळणारा पोषण आहार थांबल्याने पालकांमधूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.

स्मरणपत्र पाठवूनही कोणी दखल घेईना !
डिसेंबर, जानेवारीचा तांदूळ मिळाला होता. मात्र, पारनेर, नेवासा, श्रीरामपूरच्या 25 शाळांनी तांदूळ संपल्याचा रिपोर्ट झेडपीत पाठविला आहे. अन्य तालुक्यांतूनही माहिती संकलित केली जात आहे. तूर्त फेब्रुवारी-मार्चचा तांदूळ वाटप आदेश आलेला नाही. त्यामुळेच कालच नगरमधून पुण्याला स्मरणपत्र पाठविण्यात आल्याची विश्वसनिय माहिती मिळाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT