अहमदनगर

संगमनेर: प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भपाताचे रॅकेट? खासगी सोनोग्राफी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांची साखळी?

अमृता चौगुले

संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील आश्वी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अधिकार नसताना धाड टाकणारे घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍याला निलंबित करावे व राहुरी येथे सोनोग्राफी करून मुलगी असल्यास गर्भपात करण्यासाठी आश्वी येथे आरोग्य केंद्रावर रुग्णांना पाठविणार्‍या रॅकेटची जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी महिला संघटनांनी केली आहे.

गेल्या काही वर्षापासून सोनोग्राफी मशिनचा गैरवापर वाढला असून शासकीय यंत्रणाच कोमात गेली आहे. याचा पुरेपर फायदा जिल्ह्यातील डॉक्टरांनी घेतला आहे. सध्या सोनोग्राफी करून मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात केला जात आहे. कुठलीही कारवाई, चौकशी होत नसल्याने मुलीची संख्या झपाट्याने कमी होत आहे. लेक वाचवा अभियान गुंडाळण्यात आले असून जिल्हा व तालुका स्तरावर शासकीय वैद्यकीय अधिकार्‍यांची भूमिका संशयास्पद आहे.

विशेषतः खासगी ठिकाणी सोनोग्राफी करून संबधित डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामिण रुग्णालयात जाऊन गर्भपात करून घेण्याचा सल्ला देतात. यात साखळी कार्यरत असून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने शासकीय यंत्रणेचा गैरवापर वाढला आहे. या संदर्भात संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील प्राथमिक आरोग्य केद्रात अशा प्रकारे मुलींचा गर्भपात केला जात होता. याची माहिती मिळाल्याने या ठीकाणी छापा टाकून प्राथमिक केंद्रातील महिला डॉक्टरसह रुग्णांना रंगेहाथ पकडण्यात आले. मात्र महिला अधिकार्‍याला पाठीशी घालून रग्ण महिलांनाच दमबाजी करण्यात येत आहे.या संदर्भात कोल्हार येथील महिलेला त्रास होवू लागल्याने तिला घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात भरती केले. ती तक्रार देण्यासाठी पुढे आली असता घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍याने या महिलांना तुमच्यावरच पोलिसात तक्रार देईल अशी धमकी दिली, त्यांचा पाठलागही केला. आश्वी प्रथामिक आरोग्य केद्रांत सर्रास खासगी डॉक्टरने सोनोग्राफी केल्यानंतर मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात केला जात असल्याची माहीती काही महिलांच्या नातेवाईकांनी दिली.
या घटनेने खळबळ उडाली असून अनेक संघटनानी या संदर्भात माहिती घेतली आहे. अनेकांनी संबधित वैद्यकीय अधिकार्‍याला जाब विचारण्यासाठी संपर्क साधला असता तो ग्रामीण रुग्णालयात आलाच नाही मोबाईलही बंद होता. यामुळे या प्रकरणाचे गुढ वाढले असून महिला व बालविकास मंत्र्याकडे या संदर्भात शिवसेना तक्रार करणार आहे.

अन्यथा ग्रामीण रुग्णालयावर मोर्चा

आश्वी प्राथमिक आरोग्य केंद्रातील बेकायदा गर्भपात प्रकरण, छापा टाकण्याचा संशयित प्रकार, महिलांना दमबाजी या सर्व प्रकारणाची जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांमार्फत चौकशी करून दोषी वैद्यकीय अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयावर मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे संजय फड यांनी दिला.

माहीती घेऊन वस्तुस्थिती तपासणार

घुलेवाडी येथील वैद्यकीय अधिकारी, आश्वी प्राथमिक आरोग्य केद्रांतील अधिकारी व गर्भपात प्रकरणाची माहिती नाही. या संदर्भात माहीती घेवून वस्तुस्थिती तपासणार, अशी माहीती घुलेवाडी ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी राजकुमार जर्‍हाड यांनी दिली.

SCROLL FOR NEXT