अहमदनगर

Ashadhi wari 2023 : माऊलींचा पहिला रिंगण सोहळा; दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

अमृता चौगुले

नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'चा गजर करत नेवाशातील संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिर देवस्थानच्या पालखी दिंडीचे पहिला रिंगण सोहळा 'याची देही..याची डोळा..!' अनुभवायास मिळाला. बुधवारी (दि.14) शिवाजी महाराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पालखी दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. 'माऊली..माऊली..' असा जयघोष करत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कर्मभूमीत हा सोहळा रंगला.

सकाळी दिंडीच्या प्रस्थानाच्यापूर्वी माऊलींचे मूर्तीमंत रुप असलेल्या पैसखांबाचे वेदमंत्राच्या जयघोषात चंदनउटी लावून शिवाजी महाराज देशमुख व आमदार शंकरराव गडाख, महंत रमेशानंदगिरी महाराज, अयोध्येतील महंत रामशरण महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आली. यावेळी आमदार शंकरराव गडाख, मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, विश्वस्थ विश्वासराव गडाख, ज्ञानेश्वर शिंदे, रामभाऊ जगताप, कृष्णा पिसोटे, कैलास जाधव आदींच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊलींच्या चांदीच्या पादुकांचे पूजन करण्यात आले.

या पादुका डोक्यावर घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिराला दिंडी प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी पुष्पांनी सजविलेल्या रथामध्ये माऊलींच्या पादुका ठेवण्यात आल्या. यावेळी आमदार शंकरराव गडाख, पांडुरंग अभंग, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, सुनील वाघ, डॉ. लक्ष्मण खंडाळे यांनी या दिंडीचे दर्शन केले. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दिंडीस प्रारंभ करण्यात आला.

नेवासा नगरीत दिंडीचे आतषबाजी व तोफांची सलामी देत चौकाचौकात स्वागत करण्यात आले. विविध संस्था, सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी शिवाजी महाराज देशमुख यांचे संतपूजन करत पालखीचे दर्शन घेतले. या दिंडीचे नेवासाच्या बस स्थानक प्रांगणात साडे अकरा वाजता आगमन झाले असता रिंगण सोहळयाचे आयोजक नेवासा प्रेस क्लबचे संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे, अध्यक्ष मोहन गायकवाड, अशोक डहाळे, सुधीर चव्हाण, नाना पवार, कैलास शिंदे, श्याम मापारी, रमेश शिंदे, मकरंद देशपांडे, सुहास पठाडे, शंकर नाबदे, पवन गरुड, अभिषेक गाडेकर आदींच्या हस्ते दिंडीतील पालखीचे पूजन करण्यात आले.

एस टी महामंडळातर्फे कामगार नेते अनिल जरे यांनी वारकर्‍यांचे स्वागत केले. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल ताके, आगार व्यवस्थापक रामनाथ मगर, वासुदेव आव्हाड यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी झेंडा पथकाचे, यानंतर भजनी मंडळ व वारकर्‍यांसह महिलांचे रिंगण झाले. बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली अश्व नृत्य आकर्षण ठरले होते.

यावेळी काशिनाथ नवले, किशोर जोजार, अशोक मिसाळ, दादा गंडाळ, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले, संजय सुकाळकर, जालिंदर गवळी, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे, शिवसेनेचे अंबादास लष्करे, राजू काळे, धनु काळे, नितीन खंडाळे, सतीश मुळे आदी उपस्थित होते.

अग्रभागी नृत्य करणारे अश्व

दिंडीच्या अग्रभागी नृत्य करणारे अश्व, त्यामागे पताका खांद्यावर घेत 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' जयघोष करणारे वारकरी, भजनी मंडळाचे पथक, पुष्पांनी सजविण्यात आलेला पालखी, त्यामागे डोक्यावर तुळशी कलश घेतलेल्या महिला या दिंडीत सहभागी होत्या.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT