अहमदनगर

कोपरगावचे तब्बल 35 कैदी हरसूलला वर्ग

अमृता चौगुले

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : येथील दुय्यम कारागृहातील गंभीर गुन्ह्यांतील तब्बल 35 आरोपींना मध्यवर्ती कारागृह (हरसूल, जि. औरंगाबाद) येथे मोठ्या पोलिस बंदोबस्तात पाठविण्यात आले. या आरोपींमध्ये शिर्डी येथील सूरज ठाकरे यांच्यावर गोळीबार केलेला आरोपी किरण हजारे, रवींद्र गोंदकर, तनवीर रंगरेज, आकाश लोखंडे आदी आरोपींचा समावेश आहे. शिर्डीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिंगटोन प्रकरण, सागर शेजवळ खून प्रकरणातील सोमनाथ वाडेकर, रामा जाधव, दीपक मांजरे, शोयब शेख, किरण आजबे, विशाल कोते, लोणी पोलिस स्टेशनचा खतरनाक आरोपी शाहरुख सत्तार खान सह उर्वरित भादंविक 302, 307, 395, 376 या कलमांमधील एकूण 6 पोलिस स्टेशनच्या कोपरगाव शहर पोलिस स्टेशन, तालुका पोलिस स्टेशन, शिर्डी पोलिस स्टेशन, राहाता पोलिस स्टेशन, लोणी पोलिस स्टेशन व श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यामधील आरोपींचा यात समावेश आहे.

कारागृहाचे तुरुंगाधिकारी चंद्रशेखर कुलथे यांनी हा प्रस्ताव (दि. 7 जानेवारी 2023) रोजी कारागृह उपमहानिरीक्षक (पश्चिम विभाग येरवडा, पुणे) यांना पाठविला होता. कोपरगाव दुय्यम कारागृहात एकूण 5 कोठड्या आहेत. यामध्ये आरोपी ठेवण्याची क्षमता केवळ 25 एवढी आहे, परंतु सध्या 90 हून अधिक आरोपी संख्या झाली आहे. हे कारागृह अत्यंत जुने झाल्याने गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना वर्ग करण्यास परवानगी मिळावी, अशी प्रस्तावामध्ये मागणी केली होती.

दरम्यान, कारागृह उपमहानिरीक्षक (येरवडा) यांनी दि. 24 जानेवारी रोजी 35 आरोपींना वर्ग करण्याचा आदेश तुरुंगाधिकारी दिला होता.
कारागृह प्रशासनाने 35 गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना घेऊन जाण्यासाठी सक्षम पोलिस बंदोबस्तासह वाहनांची मागणी पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, शिर्डी यांच्याकडे (दि. 24) जानेवारी रोजी केली होती, मात्र नाशिक पदवीधर निवडणूक असल्याने पोलिस बंदोबस्त (दि. 2) रोजी प्राप्त होताच 35 आरोपींना मोठ्या पोलिस बंदोबस्तात पाठविण्यात आले.

ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक, डॉ. कृष्णा फुलसौंदर व वैद्यकीय पथकाने आरोपींची वैद्यकीय तपासणी केली. याबाबत कारागृह प्रशासनाने तहसीलदार विजय बोरुडे व तुरुंगाधिकारी चंद्रशेखर कुलथे यांना पोलिस अधिक्षक राकेश ओला आदी सातव यांचे मार्गदर्शन मिळाले.

मोठा फौजफाटा..!
कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक भरत दाते, रोहिदास ठोंबरेंसह 6 पोलिस ठाण्यांचे 24 पोलिस अंमलदार व वरिष्ठ दर्जाचे दोन उपनिरीक्षक असा मोठा फौजफाटा डिवायएसपी संजय सातव (शिर्डी भाग) यांनी कारागृह प्रशासनास पुरविला.

SCROLL FOR NEXT