अहमदनगर

नगर : धक्कादायक ! 33 लाखांचे कोव्हॅक्सिन एक्सपायर !

अमृता चौगुले

नगर :  पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात कोरोनाची भीती आजही कायम आहे. आरोग्य विभाग नागरिकांना लसीकरणाचे आवाहन करत असतानाही जनतेचा अपेक्षित प्रतिसाद भेटत नाही. त्यामुळे 31 डिसेंबर या एक्सपायरीपर्यंत वापरात न आलेले कोव्हॅक्सीनचे सुमारे 15 हजार डोस निरुपयोगी ठरले. खासगी दरानुसार शासनाचे 33 लाख पाण्यात गेले. तर आता 31 जानेवारी मुदत असलेले 2420 डोस शिल्लक असून, यातून लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य विभागाने पुन्हा जनतेला आवाहन केले आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयानक होती. यात हजारो रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक तथा प्रतिकारशक्ती वाढविणार्‍या लसीकरणाला मोठे महत्व आले. यात टप्प्प्याटप्याने वयोगटानुसार लसीकरण करण्यात आले. त्यासाठी कार्बोव्हॅक्स, कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड लस वापरात आली. मात्र कोरोनाची भिती काहीशी कमी होताच लसीकरणाकडे नागरीकांनी पाठ फिरवली. आजही सर्वच वयोगटातील पाच लाख लोकांनी पहिला डोस घेतलेला नाही, तर सात लाख लोकांनी दुसरा डोस टाळल्याचे दिसते. शासनाने मोठा खर्च करून लस उपलब्ध केलेली आहे. आरोग्य विभागाही जनजागृती करते आहे. मात्र नागरीकांना गांभीर्य नसल्याने आता उपलब्ध लस अक्षरशः फेकून देण्याची नामुष्की येणार आहे.

नागरिकांची काहीच जबाबदारी नाही का?

कोव्हॅक्सिनच्या एका कुप्पीतून (लसीची बाटली) 10 डोस दिले जातात. खासगी दवाखान्यात डोससाठी पूर्वी सहाशे व आता दोनशे पंचवीस रुपये द्यावे लागत आहे. 31 डिसेेंबरपर्यंत मुदत असलेले 2780 कुप्पी म्हणजे 27810 डोस नगरमध्ये शिल्लक होते. आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नातून 13 हजार डोसचा जनतेसाठी विनियोग झाला. मात्र उवर्रीत 15 हजार डोसची मुदत संपल्याने ते वापरणे शक्य नव्हते. आरोग्य विभागाने विल्हेवाट लावल्याची माहिती आरोग्य विभागातून समजली. त्यामुळे नागरीकांनी अजुनही लसीकरणासाठी पुढे येण्याची गरज आहे.

तर 2420 डोसही वाया जाणार

सध्या कोव्हॅक्सिनचे 2420 डोस उपलब्ध आहेत. याची मुदत ही 31 जानेवारीपर्यंत आहे. याचा वापर न झाल्यास हा खर्चही वाया जाणार आहे. त्यामुळे लसीकरणासाठी नागरीकांनी पुढे येण्याची गरज आहे.

जिल्ह्यासाठी 12 हजार कोव्हिशिल्ड डोस

डिसेंबर 2022 जिल्ह्यात कोव्हिशिल्ड ही लस शिल्लक नव्हती. तर कार्बोव्हॅक्स लसही उपलब्ध नव्हती. मात्र दोन दिवसांपूर्वीच नगर जिल्ह्यासाठी 12 हजार कोव्हीशिल्ड डोस आले आहे. त्यामुळे आता यातून लसीकरण करण्याचेही आरोग्य प्रशासनासमोर आव्हान असणार आहे.

कोरोना लसीकरणासाठी आरोग्य प्रशासन जनतेला आवाहन करत आहे. या दृष्टीने सर्व आरोग्य केंद्र तसेच अन्य यंत्रणांनाही ज्या नागरिकांचे लसीकरण शिल्लक आहे, त्यांच्या लसीकरणाबाबत आवश्यक त्या सूचना केलेल्या आहेत. नागरिकांनी लसीकरण करून घेणे अपेक्षित आहे.

SCROLL FOR NEXT