श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : घातक रसायनयुक्त कृत्रिम दूध प्रकरण उघडकीस आल्यानंतर दोन दिवसांत दुधाचे संकलन सुमारे दहा हजार लिटरने कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. याचाच अर्थ एवढ्या मोठ्या प्रमाणात दुधाची भेसळ होत होती का? याबाबत यंत्रणा खातरजमा करत आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दीपक मखरे (वय 32), वैभव राऊत (वय 25), नीलेश मखरे (वय 32), संदीप राऊत (वय 36, सर्व रा. श्रीगोंदा) अशी आज अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. श्रीगोंदा पोलिसांनी काल पाच जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील दीपक मखरे पोलिसांच्या ताब्यातून पळाला होता. पोलिसांनी पाठलाग करून त्याला जोतपूर मारुती चौकात पकडले.
कृत्रिम दुधासाठी रसायन पुरवणारा संशयित अद्यापि फरार आहे. तसेच वरील संशयित आरोपी भेसळयुक्त दूध कोणत्या प्लँटला देत होते याचीही माहिती हाती आली आहे. मात्र तो प्लँटचालकही दोन दिवसांपूर्वीच फरार आहे. रसायने ज्याच्याकडे सापडली, तो बाळासाहेब पाचपुते श्रीगोंद्यातील एका प्लँटवर दूध देत असल्याचे पुढे आले आहे. मात्र तो फरार असल्याने तो प्लांटचालक कोण, हे स्पष्ट झालेले नाही.
वर्षभरातील रेकॉर्डच नाही
संदीप मखरे याच्या डेअरीवरून पोलिसांनी काही रजिस्टर ताब्यात घेतले; मात्र ती तीन वर्षांपूर्वीची असल्याने गेल्या वर्षभरातील रेकॉर्डचा पोलिस शोध घेत आहेत.