अहमदनगर

मुलीला मारहाण करणार्‍यांना अटक करा; पाथर्डीच्या ‘त्या’ कुटुंबियांचे आंदोलन

अमृता चौगुले

अहमदनगर; पुढरी वृत्तसेवा : अठरा वर्षीय मुलीला रॉडने मारहाण झाल्याच्या घटनेतील आरोपींना अटक व्हावी, या मागणीसाठी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले. मुलीला न्याय द्यावा, या मागणीसाठी पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथील हनुमाननगर तांड्यावरील राठोड कुटुंबीय व नातेवाईकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करून आंदोलन केले. अठरा वर्षीय गीता रमेश राठोड हिला लोखंडी पाईप व रॉडने मारहाण करून ठार मारले आहे.

त्या घटनेतील काही आरोपींना अद्याप अटक केली नाही. आरोपींना लवकरात लवकर अटक केली नाही तर राठोड कुटुंबीयांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. गीता हिने प्रेम प्रकरणाला मदत करीत असल्याचा राग मनात धरुन नऊ जणांनी मिळुन गिता रमेश राठोड हिचा गळा आवळुन तिला लोखंडी पाईप व रॉडने मारहाण करुन जिवे ठार मारले. या प्रकरणातील पाच संशयीत आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

मात्र, धनदांग्यांचा आशीर्वाद असणार्‍या आरोपींना पोलिस अटक करीत नाहीत, त्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर राठोड कुटुंबीय आमरण उपोषणाला बसले आहेत. गुन्हा दाखल केल्यापासून पोलिस आमचीच चौकशी करीत आहेत आणि आमच्यावर दबाव टाकत असल्याचा आरोपी करण्यात आला आहे. मुलीला न्याय मिळावा यासाठी गोसेना यांच्या वतीने पाठिंबा जाहिर करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष रमेश चव्हाण यांनी सांगितले. रमेश राठोड, सविता राठोड, रोहिणी राठोड, रोहन राठोड, रमेश चव्हाण, प्रल्हाद चव्हाण, अशोक चव्हाण, दुर्योधन जाधव, किशोर राठोड, प्रकाश चव्हाण, विक्रम चव्हाण,विजय चव्हाण, तुकाराम चव्हाण, किसन चव्हाण हे उपस्थित होते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT