अहमदनगर

राहुरी : साडेतेरा कोटींच्या रस्ते कामांना मंजुरी : खासदार डॉ.सुजय विखे व माजी आ.कर्डिले यांची माहिती

अमृता चौगुले

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील प्रमुख रस्त्यांना अंदाजपत्रकीय निधी अंतर्गत 5 कोटी रुपये व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा नं.2 अंतर्गत 8 कोटी 40 लक्ष रुपये अशा एकूण 13 कोटी 40 लक्ष रुपये किमतीच्या रस्त्यांना नुकतीच मंजुरी मिळाली असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील व माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांनी दिली आहे.

राहुरी तालुक्यातील सोनगाव, सात्रळ, रामपूर, कोल्हार खुर्द, चिंचोली, गंगापूर, देवगाव, आंबी, अमळनेर, चांदेगाव रस्ता या रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी 1 कोटी रुपये तसेच राहुरी ते बारागाव नांदूर, वावरथ ते ढवळपुरी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी 4 कोटी रुपये असा एकूण 5 कोटी रुपये निधी अंदाजपत्रकीय निधी मंजूर झाला आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा नं.2 अंतर्गत राहुरी मतदार संघातील केंदळ खुर्द ते ब्राम्हणी रस्ता, सात्रळ माळेवाडी-डुक्रेवाडी ते कानडगाव रस्ता, वांबोरी ते धामोरी खुर्द रस्ता, वाघाचा आखाडा-टाकळीमिया ते लाख रस्ता आदी रस्त्यांना अंदाजे 8 कोटी 40 लक्ष रुपये अशा एकूण 13 कोटी 40 लक्ष रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते. त्यामुळे विकास कामांना अडसर निर्माण झाला होता. परंतु गेल्या सहा महिन्यात राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने रस्त्याच्या कामासाठी भरीव निधी उपलब्ध झाला आहे.

SCROLL FOR NEXT