अहमदनगर

‘नागेबाबा’त आणखी 80 तोळे बनावट सोनं

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहर सहकारी बँकेसह श्री संत नागेबाबा पतसंस्थेची बनावट सोनेतारण ठेवून फसवणूक केल्याचा आकडा तपासणीत वाढत आहे. बुधवारी झालेल्या तपासणीत नागेबाबामध्ये 11 तोळे बनावट सोने आढळून आले होते. तसेच शुक्रवार (दि.23) रोजी झालेल्या तपासणीत तीन खात्यात तब्बल 80 तोळे बनावट दागिने आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नागेबाबा पतसंस्थेची सुमारे 100 ते 150 खाती संशयाच्या भोवर्‍यात आली असून, संशयित खात्यांची तपासणी पोलिसांकडून सुरू आहे. शहर बँकेतील बनावट सोनेतारण प्रकरणाची व्याप्ती वाढत असतानाच नागेबाबा पतसंस्थेत बनावट सोनेतारण प्रकरण उघडकीस आल्याने ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

शहर बँकेच्या पॅनलवरील गोल्ड व्हॅल्युअर अजय कपाळे यांच्या घर झडतीत पोलिसांना शहर बँकेतील तीन शाखांच्या कर्ज पावत्या तसेच संत नागेबाबासह इतर काही पतसंस्थांच्या कर्ज पावत्या आढळून आल्या होत्या. त्यामुळे पतसंस्थांमधील कर्ज खाती तपासण्यासाठी पोलिसांकडून पत्रव्यवहार करण्यात आला होता. नागेबाबाच्या कर्ज खात्यांची तपासणी केली असता, बुधवारी 11 तोळे बनावट सोने आढळून आले. त्यानंतर केडगाव शाखेचे शाखाधिकारी अनिल रामकिसन देशमुख यांच्या फिर्यादीवरून बुधवारी गोल्ड व्हॅल्युअर अजय किशोर कपाले, सुनिल ज्ञानेश्वर अळकुटे, श्रीतेश रमेश पानपाटील, संदीप सिताराम कदम व खातेधारक वसिम निसार शेख अशा पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शुक्रवारी झालेल्या कर्ज खात्यांच्या तपासणीत सुमारे 29 लाखांचे 80 तोळे सोने बनावट असल्याचे आढळून आले आहे. तसेच, गुन्ह्याती आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांना केडगावच्या गुन्ह्यात वर्ग करून ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी चौकशीसाठी अजय किशोर कपाले, सुनिल ज्ञानेश्वर अळकुटे, श्रीतेश रमेश पानपाटील, संदीप सिताराम कदम अशा चौघांना अटक केली असून पानपाटील याला दि.27 सप्टेंबर पर्यत पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. तर इतर तिघांना दि.27 रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

संत नागेबाबा पतसंस्थेच्या तीन खात्यात शुक्रवारी 80 तोळे बनावट सोने आढळून आले. पतसंस्थेच्या इतर खात्यांची तपासणी सूरू असून फसवणुकीचा आकडा आणखी वाढणार आहे.
                                                  गजेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक, कोतवाल

भिंगारमधील पतसंस्थेची होणार तपासणी
आरोपी गोल्ड व्हॅल्युअर अजय कपाले याच्या घर झडतीत पोलिसांना शहर बँकेसह इतर काही नामांकित पतसंस्थाच्या कर्ज पावत्या आढळून आल्या आहेत. त्या सर्व पतसंस्थांना कर्ज खाती तपासण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. नागेबाबामधील बनावट सोनेतारण प्रकरण उघडकीस आल्यानंतर, भिंगारमधील एका पतसंस्थेची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

SCROLL FOR NEXT