नगर : पुढारी वृत्तसेवा : गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सणानिमित्त साखर, चणाडाळ, रवा प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर पामतेल या चार शिधा जिन्नस असलेला 'आनंदाचा शिधा' शंभर रुपयांत शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्यात येणार आहे. त्यानुसार 1 एप्रिलपासून जिल्ह्यात 'आनंदाचा शिधा' वाटपासाठी जिल्हा पुरवठा विभागाची धावपळ सुरु आहे. जिल्ह्यातील 30 लाख जनतेला याचा लाभ मिळणार आहे.
राज्यातील गोरगरीब जनतेला दिवाळी सणात गोडधोड पदार्थ करता यावे आणि दिवाळी उत्साहात साजरी करण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना साखर, चणाडाळ, रवा व पामतेल या चार वस्तूंचा समावेश असलेला 'आनंदाचा शिधा' अवघ्या शंभर रुपयांत वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार 'आनंदाचा शिधा' घेऊन जिल्हाभरातील सर्वच पात्र गोरगरीब शिधापत्रिकाधारकांनी दिवाळी साजरी केली.
आता गुढीपाडवा व डॉ. आंबेडकर जयंती या सणासाठी देखील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत 'आनंदाचा शिधा' इॅ-पॉस प्रणालीद्वारे वितरित करण्यात येणार आहे. गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीत वितरित करण्याचे निर्देश शासनाने जिल्हा पुरवठा विभागाला दिले आहेत.
त्यानुसार वितरणाचे नियोजन जिल्हा पुरवठा विभागाने केले आहे. आतापर्यंत शेवगाव, नगर तालुक्यातील काही गावांत आनंदाचा शिधा वाटपासाठी उपलब्ध झाला आहे. मार्चअखेरपर्यंत सर्वच तालुक्यांत आनंदाचा शिधा उपलब्ध होणार आहे. एप्रिलपासून वाटपास प्रारंभ होणार आहे. 14 एप्रिलपूर्वी आनंदाचा शिधा वितरित करण्याचे निर्देश शासनाने जिल्हा पुरवठा विभागाला दिले आहेत.