अहमदनगर

नगर : तनपुरे साखर कारखान्यावरून ‘रणकंदन’

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  चालू गळीत हंगामात बंद पडलेल्या तनपुरे कारखान्यावरून आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एका गटाने तनपुरे कारखाना बंद पडल्यानंतर संचालक मंडळाची मुदत संपल्याने निवडणूक घेण्यासह विविध मागण्यांसंदर्भात माजी संचालक व शेतकर्‍यांनी चक्री उपोषणाचा इशारा दिला होता. खासदार डॉ. सुजय विखे यांसह संचालक मंडळाची बदनामी केली जात असल्याचे सांगत भाजपच्या नेत्यांसह कारखाना संचालक मंडळाने एकत्र येत उपोषण करणार्‍यांचा बोलविता धनी कोण? असा प्रश्न विचारत कारखाना बंद पाडण्यास जबाबदार असणार्‍यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राहुरी तालुक्यात कोणत्या न कोणत्या कारणास्तव राजकारणातील सुप्त संघर्ष तेवत आहे. तनपुरे कारखाना बंद ठेवल्याबाबत माजी संचालक अमृत धुमाळ, पंढरीनाथ पवार, अरूण कडू, राजूभाऊ शेटे, धनराज गाडे, दिलीप इंगळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरेे आदींनी एकत्र येत कारखान्याबाबत चक्री उपोषणाचा इशारा दिला होता. संबंधितांनी संचालक मंडळाची मुदत संपूनही निवडणूक का घेतली जात नाही? कामगारांचे कोट्यवधी रुपयांचे पगार थकविण्यात का आले? जमिन विक्री प्रकरणाची चौकशी, गैर कारभाराबाबत प्रादेशिक सहसंचालक, नगर व साखर आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडून कारखान्याबाबत सखोल चौकशी होऊन दोषी संचालक मंडळावर कारवाईसाठी चक्री उपोषणाचा प्रारंभ आज (दि. 11) पासून करणार असल्याचा इशारा दिला होता.

संबंधितांच्या चक्री उपोषणाचा इशारा पाहता भारतीय जनात पार्टीचे पदाधिकारी व कारखान्याच्या सत्ताधारी संचालक मंडळाने संतापत तहसीलदार फसियोद्दीन शेख व पोलिस निरीक्षक मेघश्याम दांडे यांना निवेदन सारद केले आहे. भाजप व संचालक मंडळाने सांगितले की, खासदार डॉ. विखे यांनी अपार मेहनत घेत बंद पडलेला तनपुरे कारखाना सुस्थितीत आणला. कामगारांचे व सभासदांचे थकीत देयके अदा करताना सन 2017-18 सालीचा गळीत हंगाम यशस्वी करून दाखविला. कारखान सुरू असताना 95 टक्के कामागारांचे देयके अदा करण्यात आले. तसेच 8 कोटी रुपयांचा पीएफ शासकीय तिजोरीत भरण्यात आला.

जिल्हा बँकेला 50 कोटी रुपये अदा झाले. याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, माजी उपाध्यक्ष श्यामराव निमसे, सुरेशराव बनकर, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष अमोल भनगडे, तानाजीराव धसाळ, युवराज गाडे, दादा पाटील सोनवणे, सुरशिंगराव पवार, शिवाजी डौले, अंकूश बर्डे, उत्तमराव खुळे, नंदकुमार डोळसे, महेंद्र तांबे, शिवाजी सयाजी गाडे, उत्तमराव आढाव, मधुकर पोपळघट, दिलीप गाडे, ज्ञानेश्वर भिंगारदे, विलास गोपाळे, सुभाष गायकवाड, प्रभाकर हरिश्चंद्रे, सुजय काळे, अक्षय तनपुरे, उमेश शेळके, अतिक बागवान, ज्ञानेश्वर विखे, मनोज गव्हाणे आदींची उपस्थिती होती.

तेव्हा विरोधक पुढे का आले नाही?

खासदार डॉ. सुजय विखे यांनी बंद पडलेल्या तनपुरे कारखान्याला उजाळा देऊनही काहींनी आरोप केले. व्यथित होऊन खा. विखे यांनी तनपुरे कारखान्यातून थांबा घेत मोठ्या मनाने कारखाना विरोधकांच्या ताब्यात देण्यास होकार दर्शविला. आमदार तनपुरे यांसह विरोधकांना तनपुरे कारखाना सुरू करण्याचे आवाहन केले होते. एवढाच सभासद व कामगारांचा कळवळा होता तर पुढे येऊन कारखाना सुरू करून विरोधकांनी निष्ठा दाखवून देणे गरजेचे होते. कारखाना बंद पाडण्यासाठी कारणीभूत असलेल्यांनीच डॉ. विखे यांच्यावर खोटे आरोप करून कारखाना बंद पाडण्याचे कारस्थान केले असल्याचा आरोप यावेळी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT