अहमदनगर

नगर : पिकअप विहिरीत; 3 वर्षांच्या बाळासह एकूण 8 वर्‍हाडी जखमी

अमृता चौगुले

कोपरगाव (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  वर्‍हाडाच्या पिकअप गाडीला कट मारल्याने ती पलटी होऊन रस्त्याच्या कडेला विहिरीतील पाण्यात पडल्याची दुर्घटना आज (गुरुवार) सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात 8 जण जखमी झाले. गाडी विहिरीत पडताना तिचा पुढचा भाग वर असल्याने सुदैवाने मोठी जीवित हानी टळली. तालुक्यातील तळेगाव मळे हद्दीत जुना मुंबई- नागपूर महामार्गावर हॉटेल निसर्गजवळ हा अपघात झाला. पिकअपमधील सहाजण कोपरगाव तालुक्यातील सोनार वस्ती तर दोघे रवंदे येथील रहिवाशी आहेत. रवंदे येथून खुलताबाद येथे लग्नाला जात असताना ही दुर्घटना घडली, मात्र त्यांचे दैव बलवत्तर म्हणून सर्वजण अपघातातून सुखरूप बचावले.

गाडीतील जखमींना नागरिकांनी वर काढले. त्यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात नेले. दरम्यान, एकजण विहिरीत असल्याची शंका उपस्थित नागरिकांकडून वर्तविण्यात येत असल्याने ग्रामीण पोलिस वीज मोटारीच्या साहाय्याने विहिरीतील पाणी उपसून कोणी आहे का, याचा शोध घेत होते. उपस्थितांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज (गुरुवारी) सकाळी 10 वाजेच्या सुमारास (एम एच 15 जेसी 1023) नंबरच्या पिकअप गाडीचा अपघात झाला. त्यातील काहींना उपचारासाठी कोपरगावात खासगी हॉस्पिटल व काहींना वैजापूर येथे खासगी हॉस्पिटलमध्ये नेले.

घटनास्थळी पोउनि सुरेश आव्हाड, महेश कुसारे, पो. काँ. अंबादास वाघ, जयदीप गवारे, कोतकर, पो. ना. साळुंके टीमसह दाखल झाले. उपस्थित नागरिकांनी विहिरीत दुचाकी व एक इसम पडलेला असल्याची शंका व्यक्त केल्याने पोलिसांनी विहिरीतील पाणी उपसून शोधकार्य सुरू केले. पुढील तपास पो. नि. वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव पोलिस करीत आहे.

सुदैवाने जीवितहानी टळल्याने सुटकेचा निःश्वास
पिकअप गाडी रस्त्याच्या बाजूला थेट शेतालगत विहिरीत पडली. यात 3 वर्षांच्या बाळासह एकूण आठजण होते. विहिरीतील पाण्यात पडली तेव्हा पिकअप गाडीची पुढची बाजू वरच्या दिशेला होती. त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. पिकअपमधील सर्व जखमींना बाहेर काढण्यात यश आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT