Amit Shah
अहिल्यानगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदतीसाठी केंद्र सरकारकडून तत्काळ सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यात कोणताही विलंब करणार नाहीत. लोणी येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज शिर्डी, राहाता आणि कोपरगाव दौऱ्यावर आहेत. दौऱ्याची सुरुवात त्यांनी सकाळी शिर्डी साईबाबा मंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन केली. समाधीचे दर्शन घेतल्यानंतर शाह यांच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा करण्यात आली, तसेच 'शिर्डी माझं पंढरपूर' ही छोटी आरतीही करण्यात आली. दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने शहा यांचा शॉल आणि साईबाबाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जलसंपदामंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
साईबाबांच्या दर्शनानंतर शाह, फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व मंत्री लोणीकडे रवाना झाले. प्रवरानगर येथील विखे पाटील साखर कारखान्याच्या विस्तारित कामाचे उद्घाटन तसेच लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण करण्यात आल्यानंतर लोणी बाजारतळ येथे अमित शाह यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला.
यावेळी बोलताना शहा म्हणाले की, "महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर संकट आहे. ६० लाख हेक्टरवरील पिके उध्वस्त झाली आहेत. ३१३२ कोटी राज्याला दिलेले आहेत, त्यातील काही रक्कम एप्रिलमध्ये दिली आहे. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. २२०० कोटींची मदत केली आहे," असे शहा यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना ते म्हणाले की, "काल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची माझ्याशी बैठक झाली. राज्यातील या त्रिमूर्ती पैकी एकही व्यापारी नाही, पण व्यापाऱ्यापेक्षा कमी नाहीत. कार्यक्रमाला बोलावलं, पण चर्चा मात्र शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत केली. मी त्यांच्याकडून अहवाल मागवला आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांना तात्काळ मदत करेल, त्यात वेळ वाया घालणार नाही," असे अश्वासन त्यांनी दिले.