अहमदनगर

नगर : बंधार्‍यांसाठी शासन निर्णय सुधारीत करा : आमदार नीलेश लंके

अमृता चौगुले

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : गोदावरी खोर्‍यात 3.5 दशलक्ष घनफूटपर्यंत पाणी साठवण क्षमता असलेल्या साठवण बंधारे, सिमेंट बंधारे, तसेच कोल्हापूर बंधारे बांधण्यासाठी शासनाचा पूर्वीचा निर्णय सुधारीत करण्याची मागणी आमदार नीलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  आमदार लंके यांनी फडणवीसांना पाठविलेल्या निवेदनात नमुद केले की, गोदावरी खोर्‍यात जायकवाडी प्रकल्पाच्या वरील बाजूस कोणतेही नवीन प्रकल्प हाती न घेण्याबाबत जनहित याचिकेच्या अनुषंगाने शासनाने परिपत्रक जारी केले आहे. गोदावरी खोर्‍यात व जायकवाडी प्रकल्पाच्या वरील बाजूस कोणतेही नवीन प्रकल्प घेऊ नये, असे आदेशित करण्यात आले आहे.

3.50 दशलक्ष घनफूट क्षमतेपेक्षा जास्त साठवणूक क्षमता असलेल्या सर्व योजनांना नाशिकच्या नियोजन व जल विज्ञान विभागाचे मुख्य अभियंत्यांचे प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्यात आले. आमदार लंके यांनी निवेदनात म्हंटले की, माझ्या मतदारसंघातील कायमस्वरुपी दुष्काळी गावातील शेतकर्‍यांना छोटे सिमेंट बंधारे, साठवण तलाव, कोल्हापुरी पध्दतीच्या बंधार्‍यांशिवाय पाण्याचा कोणताही स्त्रोत नाही, अशा शेतकर्‍यांसाठी शासनाचे परिपत्रक अन्याय कारक आहे. जायकवाडी प्रकल्पातील पाण्यामध्ये तूट निर्माण होईल असे लघु, मध्यम व मोठे पाटबंधारे प्रकल्प हाती घेऊ नयेत; परंतु 3.50 दशलक्ष घनफूटपर्यंत पाणी साठवण क्षकता असलेले साठवण बंधारे, सिमेंट बंधारे, कोल्हापुरी बंधार्‍यांच्या कामांसाठी शासन निर्णय रद्द करण्यात यावा. जायकवाडी प्रकल्पाच्या वरील बाजूस 3.50 दशलक्ष घनफूटपर्यंत साठवण क्षमता असलेल्या जलसंधारणाच्या कामांना मान्यता देण्याबाबत शासन निर्णय सुधारीत करण्यात यावा, अशी मागणी आमदार लंके यांनी निवेदनात केली आहे.

SCROLL FOR NEXT