अहमदनगर

नगर : नाहाटा वगळता सारे शरद पवारांसोबत

अमृता चौगुले

श्रीगोंदा : अमोल गव्हाणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी पक्षाविरुद्ध बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली. याचे राज्यात पडसाद उमटत असतानाच श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. माजी आमदार राहुल जगताप यांनी सावध पवित्रा घेत शरद पवार यांच्यासोबत राहण्याच्या निर्णयाचे तालुकावासीयांकडून समर्थन मिळत आहे. मात्र बाळासाहेब नाहाटा यांनी मात्र अजित पवारांच्या बाजूने कौल दिला आहे.

गेल्या दोन दिवसात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. त्यांचे पडसाद श्रीगोंदा तालुक्यात उमटणे साहजिक आहे. श्रीगोंदा तालुका आणि शरद पवार यांचे नाते जिव्हाळ्याचे. पवार यांचे तालुक्यावर विशेष लक्ष. तत्कालीन आमदार बबनराव पाचपुते, राहुल जगताप याना राजकीय पटलावर वेगळे अधिष्ठान प्राप्त करून देण्यात पवार यांचा विशेष वाटा आहे .

राष्ट्रवादी काँगेस पक्षात फूट पडल्यानंतर तालुक्यातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेते नेमक्या कोणत्या गटात जाणार याबाबत खल सुरू असतानाच राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी आपण अजित पवार यांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले. नाहाटा वगळता इतर नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी श्रीगोंदा येथे घेतलेली सभा आजही तालुकावासीयांच्या स्मरणात आहे. एका सभेत वातावरण फिरविण्याची पवार यांची ताकद तालुक्याने अनुभवली. 2014 च्या निवडणुकीत उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला असताना पवार यांनी नागवडे-जगताप गटाला एकत्र करत राहुल जगताप यांना उमेदवारी देऊन निवडून आणले होते. नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडी दरम्यान शरद पवार यांनी राहुल जगताप यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला होता. रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी निवडीत राहुल जगताप यांना संधी दिली.

सामाजिक माध्यमांवर राज्यात घडणार्‍या घडामोडींचा ऊहापोह केला जात आहे. राहुल जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले जात आहे. राजकीय पटलावर घडणार्‍या घडामोडी नित्य बदलत असतात. पण शरद पवार हे प्रतिकूल परिस्थिती असताना तालुक्यातील राष्ट्रवादीने दाखविलेले समर्थन नक्कीच एक नवीन आयाम प्राप्त करून देणारे ठरेल. आजच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता अजित पवार आणि भाजप यांची युती झाली असेच म्हणावे लागेल. उद्याच्या विधानसभा निवडणुका दोघांनी एकत्र लढल्या तर श्रीगोंदा विधानसभेची जागा भाजपला जाणार हे निश्चित आहे. त्या संदर्भाचा विचार केला जातो आहे. उद्याची राजकीय परिस्थिती काय असेल हे भविष्यात घडणार्‍या घडामोडींवरून तरी वर्तविणे जिकिरीचे बनले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT