अहमदनगर

माझी वसुंधरा अभियान : अहमदनगर जिल्हा परिषद राज्यात दुसरी..!

अमृता चौगुले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : माझी वसुंधरा अभियानातील सर्वोत्तम कामगिरीत नगर जिल्हा परिषदेचा राज्यात दुसरा क्रमांक आला. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते मुंबईत झालेल्या विशेष कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी हा सन्मान स्वीकारला. दरम्यान, राहुरी, शिर्डी, अकोले नगरपंचायतींसह पेमगिरी, अस्तगाव ग्रामपंचायतींनीही या अभियानात नगरचा डंका वाजविला आहे.

माझी वसुंधरा अभियान-3 हे राज्यात 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत राबविण्यात आले. यात राज्यातील 411 नागरी संस्था व 16413 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. या अभियानात केलेल्या कामाचे मूल्यमापन व फिल्ड मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात आले. त्यातील गुणांच्या आधारे लोकसंख्यानिहाय 11 गटांतील विजेते, तसेच महसूल विभाग व जिल्ह्याच्या एकूण कामगिरीवरून सर्वोत्तम विभागीय आयुक्त, सर्वोत्तम जिल्हाधिकारी व सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी-जिल्हा परिषद यांची निवड करण्यात आली आहे.

यात, 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या अमृत गटात राज्यस्तरावर अहमदनगर महापालिका दुसरी आली. 25 ते 50 हजार लोकसंख्येच्या गटात शिर्डी नगरपरिषदेने राज्यस्तरावर तिसरा क्रमांक (2 कोटींचे बक्षीस) पटकावला. विभागस्तरावर राहुरी नगरपरिषदेने नाशिक विभागात पहिले स्थान (दीड कोटींचे बक्षीस) पटकावले आहे. तसेच 15 ते 25 हजार लोकसंख्येच्या गटवारीत नाशिक विभागात अकोले नगरपरिषद पहिली आली असून त्यांना 1.5 कोटींचे बक्षीस प्राप्त झाले आहे.

10 हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायत गटात संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी ग्रामपंचायत राज्यात दुसरी आली आहे. त्यांस 1.5 कोटीचे बक्षीस मिळाले. राहाता तालुक्यातील अस्तगाव ग्रामपंचायत नाशिक विभागात पहिली आली आहे. त्यांना 75 लाखांचे बक्षीस प्राप्त झाले आहे. अडीच ते पाच हजार लोकसंख्येच्या गटात पेमगिरी ग्रामपंचायत नाशिक विभागात पहिली आली आहे. त्यांना 50 लाखांचे बक्षिस मिळाले.

SCROLL FOR NEXT